खराडी भागात चालविण्यात येणाऱ्या एका ‘स्पा’ मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून कामावर असलेल्या तरुणीला स्पा’ मॅनेजरनेच शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्पा’ मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
हितेशकुमार मेहरा (22, रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. याबाबत 39 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी खराडीतील एका स्पा’ मध्ये ही घटना घडली. संबंधित ‘स्पा’ हा अधिकृत असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यापासून खराडी भागात हा ‘स्पा’ सुरू झाला आहे. तेव्हापासून मेहरा हा तिथे मॅनेजर म्हणून काम करतो. तर, पीडित महिला ही महिन्याभरापासून तिथे कामाला लागली होती. 29 तारखेला ‘स्पा’ मधील एका रूममध्ये फिर्यादी महिला या एकट्याच होत्या. त्यावेळी मॅनेजर तेथे आला. आतून कडी लावून त्याने फिर्यादीची छेड काढत शरीरसुखाची मागणी केली. त्यास फिर्यादीने नकार दिला असता कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. उद्यापासून कामावर आलीस तर तुला मी मारेन, असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी मॅनेजरला अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
… अवैध स्पा’ चा बोलबाला
शहरातील अनेक भागात चोरी – छुप्या पद्धतीने अवैध स्पा’ सुरू आहेत. अशा स्पा’वर वेळोवेळी कारवाया होत नसल्याने गुन्हेगारी घटना देखील समोर येत आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली हे स्पा चालविले जातात.