
चंदिगडमधील उद्योजक एम. के. भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवाळीत कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट देणारा बॉस अशी त्यांची ओळख बनली आहे. मागील दोन वर्षांप्रमाणे या वर्षीही त्यांनी काही कर्मचाऱ्यांना कार भेट म्हणून दिल्या आहेत. या कार कर्मचाऱ्यांची रँक आणि कामगिरीच्या आधारे देण्यात आल्या. भाटिया यांनी एकूण 51 कार वाटून आपली परंपरा राखली. त्या वेळी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर शहरातून कार गिफ्ट रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. सजवलेल्या कारचा ताफा रस्त्यावरून निघाला. या कार रॅलीचे लोकांनी फोटो काढले.
याविषयी भाटिया म्हणाले, “माझे कर्मचारी माझ्या फार्मा कंपन्यांची खरी ताकद आहेत. त्यांचे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा ही आमच्या यशामागील प्रेरक शक्ती आहे. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रेरित करणं हे माझं कर्तव्य आहे. ही केवळ भेटवस्तू नाही, तर टीमला प्रेरणा देण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ’’