रात्रीच्या संदेशामुळे राधे माँ अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदिगड

स्वयंघोषित संत राधे माँ यांना रात्री बेरात्री सुरेंद्र मित्तल या व्यक्तीबरोबर संवाद साधणे  महागात पडणार आहे. मित्तल यांनी राधे माँ बरोबर झालेल्या संवादाचे पोलिसांना दिलेले रेकॉर्डींग राधे माँ च्या आवाजाशी तंतोतंत जुळत असल्याची महिती पंजाबच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी पंजाब-हरयाणा न्यायालयाला दिली आहे. यामुळे राधे माँ च्या अडचणीत वाढ झाली आहे.

फर्स्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, राधे माँ यांनी धमकी दिल्याचा आरोप सुरेंद्र मित्तल यांनी केला होता. तसेच पुरावा म्हणून त्यांनी राधे माँ यांच्या संभाषणाची रेकॉर्ड पोलीस आणि प्रसारमाध्यमांना दिली होती. धमकी देणे, मानसिक छळ तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांनी राधे माँ यांच्या विरोधात तक्रार अर्जही दिला होता. त्यानंतर राधे माँ यांच्याविरोधात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंजाब पोलिसांना दिले होते. राधे माँ यांच्याविरोधात सर्वप्रथम मित्तल यांनीच तक्रार दाखल केली होती.

काही वर्षांपूर्वी फगवाडा येथे राधे माँने आपण देवीचा अवतार असल्याचे सांगत लोकांना तिची पूजा करण्याचा आदेश दिला होता. यास मित्तल यांनी विरोध केला होता. राधे माँ ढोंगी असून थोतांड करत असल्याचे मित्तल यांनी लोकांना सांगितले ेहोते. त्यानंतर राधे माँने सर्व गावकऱ्यांची जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर राधे माँने तिकडून गाशा गुंडाळत मुंबईकडे आपला मोर्चा वळवला. येथे आल्यावर तिने ती देवीचा अवतार असल्याचे जाहीर केले.

निकी गुप्ता या महिलेने २०१५ मध्ये राधे माँ यांच्यामुळेच सासरी आपला छळ होतो असा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. तपासाअंती ठोस पुरावा सापडत नसल्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या यादीतून राधे माँ यांना वगळण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या या या भूमिकेवर निकी गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण आता मित्तल यांनी दिलेल्या रेकॉर्डमध्ये राधे माँ यांचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संभाषण व्हायरल झाले असून यात राधे माँ रात्री ३ वाजता मित्तल यांना फोन करून उगाच त्रास देत असल्याचे समोर आले आहे. ”आपण नाईट बर्ड आहोत. माझ्या आवाजाचे संपू्र्ण जग वेडे आहे. मला माहीत आहे की तुझे माझ्यावर प्रेम आहे. मला आय लव्ह यू म्हण”, अशा प्रकारचे संवाद राधे माँ मित्तल याच्याबरोबर करत असल्याचे या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. राधे माँ रात्री बेरात्री फोन करून आपल्याशी अश्लील संभाषण करायची आपण नकार देताच ती धमकावयाची असा आरोप मित्तल याने केला आहे.