खेळातून शिकूया गुंतवणुकीचे तंत्र

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

गुंतवणूक करताना, म्युच्युअल फंड, शेअर यांसारख्या आक्रमक खेळाडूंबरोबर, बँक, बॉण्डस्, पारंपरिक विम्यासारख्या सुरक्षित खेळाडूंनादेखील सोबत घेणे बरोबर आहे. बाजार पडल्यामुळे गुंतवणूक डबघाईला आल्यावर याच सुरक्षित गुंतवणुका आपल्याला स्थिर राहायला मदत करतात.

जीवन म्हटलं तर सांघिक खेळाप्रमाणेच आहे. जीवनातले चढ उतारही अगदी खेळातल्या डावाप्रमाणेच असतात. खेळताना परिस्थितीमध्ये होणारे बदल कधी कधी खेळाडूंना पेचात पकडतात. पण जे खेळाडू योग्य तंत्राचा वापर करतात तेच विजयाकडे कूच करतात. हल्लीच्या तरुण मंडळींना जीवनाची मॅच म्हणजे क्रिकेटमधली टी-ट्वेन्टीच वाटते. त्यामुळे खूपच शॉर्ट टर्म विचार करून आर्थिक नियोजनाची आखणी केली जाते. तर काहीजण वन डे मॅचप्रमाणे आखणी करतात. पण खरं तर जीवनाची मॅच तर पाच दिवसाच्या टेस्टप्रमाणे असते. अनेक चढ- उतार या प्रवासात अनुभवायला मिळतात. ज्या व्यक्ती फक्त आतापुरता विचार करतात ते मध्यम व लांब पल्ल्याच्या ध्येयासाठी प्लॅनिंग करीत नाहीत व एक दिवस हे मध्यम व लांब पल्ल्याची ध्येयं जेव्हा जवळ येतात तेव्हा मात्र ती व्यक्ती हतबल होते.

उदाहरणच द्यायचं झालं तर 25 वर्षे वयाच्या व्यक्तीला निवृत्तीचे प्लॅनिंग करायचे असेल व त्याला वयाच्या 60 व्या वर्षी 2 करोड जमा करायचे आहेत तर 7 टक्के व्याजदराने त्याला दरमहा फक्त 11040/- गुंतवणूक करायला लागते. हीच बचत त्याने वयाच्या 50 व्या वर्षी सुरू केली तर त्याला दरमहा 114880/- गुंतवावे लागतील. म्हणजे 200 रन्स 50 ओव्हरमध्ये पूर्ण करण्याचे टार्गेट 10 ओव्हरवर आले तर खेळाडूची काय अवस्था होईल याचा विचार करा.

कुठलाही सांघिक खेळ बघा, संघांची आखणी करताना बचावात्मक व आक्रमक खेळाडूंचा समावेश आपल्या संघात करतात. गुंतवणूक करताना, म्युच्युअल फंड, शेअरसारख्या आक्रमक खेळाडूंबरोबर, बँक, बॉण्डस्, पारंपरिक विम्यासारख्या सुरक्षित खेळाडूंनादेखील सोबत घेणे बरोबर आहे. बाजार पडल्यामुळे गुंतवणूक डबघाईला आल्यावर याच सुरक्षित गुंतवणुका आपल्याला स्थिर राहायला मदत करतात. त्यामुळे शेअर मार्पेटमधील गुंतवणूक गरजेच्यावेळी न तोडता वाढीसाठी तशीच गुंतवून ठेवू शकतो व भविष्यात नफा मिळवू शकतो.