मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं दु:ख

शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषीत केले. त्यानंतर भाजपने अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला वगैरे अशा बतावण्या केल्या मात्र अखेर आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे सत्य बाहेर आले. भाजप नेत्यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपची राज्य कार्यकारिणीच्या बैठक पनवेल येथे सुरू आहे. या बैठकीत संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले,”केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. खासकरून देवेंद्रजींनी त्यांच्या मनावर दगड ठेवला होता. हे दु:ख पचवून आपण पुढे गेलो, कारण आपल्याला पुढे जायचं होतं”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. याच व्हिडीओमध्येच चंद्रकात शिंदे म्हणताना दिसतात की मुंबई आपल्याला जिंकायची आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटणार आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून तो व्हिडीओ सगळीकडून डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.