चंद्रपूर – बल्लारपूर शहरात भर चौकात गोळ्या घालून युवकाची हत्या

602
प्रातिनिधिक फोटो

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भरदिवसा चौकात झालेल्या एका हत्येने दहशतीचे वातावरण पसरले आहे. सुरज बहुरिया नामक कोळसा व्यवसाय करणाऱ्या युवकाचा गोळ्या घालून दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे.

बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड भागात सुरज बहुरिया कारमध्ये बसून जाण्यासाठी निघत असताना काही युवक कारजवळ आले. त्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून सुरज बहुरिया यांना ठार मारले. दरम्यान चौकात झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने बहुरिया याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र जिल्हा रुग्णालयात समर्थकांनी गोंधळ घालून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकत रुग्णवाहिका बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या समोर उभी केली आहे.

यामुळे परिसरात शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची कुजबूज शहरात आहे. दरम्यान घटनास्थळी तीन रिकामी काडतूसे तर तीन भरलेल्या गोळ्या आढळून आल्या. चंद्रपूर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांना या हत्येनंतर सतर्क करण्यात आले असून बल्लारपूर शहरात बंदोबस्त वाढविण्यात येत आहे. ही हत्या कुणी केली याबाबत पोलीस वेगवान तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या