चंद्रपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे वेगवेगळे मंडप

गणरायाच्या विसर्जनाच्या निमित्ताने भाजपमधील दुफळी पुन्हा एकदा समोर आली. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरून बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघते. हजारो गणेशभक्त यात सहभागी होतात. बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे मंडप रस्त्यालगत लागतात. हा दरवर्षीचा शिरस्ता आहे. आजवर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचाच मंडप राहायचा. मात्र, भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी आपला वेगळा मंडप उभारला. त्यामुळे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल

आजपर्यंत जिल्ह्यातील भाजप सुधीर मुनगंटीवार यांच्याभोवती केंद्रीत होती. पण मंत्रिमंडळातील स्थान गेल्याने पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी त्यांची साथ सोडली. त्यातच आमदार जोरगेवार यांनी हट्ट करून शहर अध्यक्षपद आपल्या गटाला मिळवल्याने चंद्रपूर शहरात आपणच पक्षाचे कर्तेधर्ते आहोत, असा संदेश ते देत आहेत. त्यामुळे आजवर विसर्जन मिरवणुकीत पक्षाचा जो मंडप असायचा तो आपणच लावणार, अशी भूमिका घेत त्यांनी मुनगंटीवारांना थेट विरोध केला. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या समर्थकांनी बाजूलाच दुसरा मंडप उभारून जोरगेवारांना शह देण्याचा प्रयत्न केला.

भाजपमधील हा कलह आज जाहीरपणे लोकांपुढे आला. त्यामुळे आजवर शिस्तीत असणाऱ्या पक्षाची कशी स्थिती झाली, हेही लोकांनी बघितले. यावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर बोलण्याचे टाळून आपण परंपरा कायम ठेवल्याचे सांगत स्वतःच्या कृतीचे समर्थन केले.