चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या राखी कंचरलावार यांची निवड

975

भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूर शहर मनपाच्या नव्या महापौर असतील. तर भाजपच्या राहुल पावडे यांचा उपमहापौरपदी  विजय झाला आहे. चंद्रपूर शहर मनपाच्या नव्या महापौर -उपमहापौरपदासाठीची निवडणूक गांधी चौकातील महात्मा गांधी भवनात आज सकाळी सुरू झाली. राणी हिराई सभागृहात सर्वप्रथम महापौर निवडणुकीतील काँग्रेसच्या सुनीता लोढीया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत थेट लढत ही भाजपच्या राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे यांच्यात होणार हे निश्चित झाले.

पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमनार यांनी बैठकीचे संचालन केले. यात भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार राखी कंचर्लावार  यांना 42 मत मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना 22 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची लढत काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांच्याशी झाली. येथेही 42 विरुद्ध 22 मतांनी भाजपचा विजय झाला. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तागट नव्या महापौरपदाच्या उमेदवारीबद्दल नाराज असल्याच्या वार्ता होत्या. त्यासाठी या सर्व नगरसेवकांना पेंच आणि नंतर ताडोबातील रिसॉर्टमध्ये पर्यटन घडवण्यात आले.

भाजपला आपला स्वतःचा गट एकत्र ठेवण्यात यश मिळाले असून त्यामुळे शहर मनपावर भाजपचा पुन्हा एकदा झेंडा रोवला गेला आहे. नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार यांनी शहर विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी भावना व्यक्त केली आहे.

राखी कंचरलावार यांचा राजकीय प्रवास

– 2012 मध्ये मनपा स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत विजय

– काँग्रेसच्या तिकिटावर विजय

– अडीच वर्षांनंतर शहराच्या दुसऱ्या महापौर झाल्या. यासाठी काँग्रेसमधून फुटून भाजपची मदत घेत महापौर झाल्या.

– 2017 मध्ये झालेल्या मनपाच्या दुसऱ्या निवडणुकीतही विजय.

– यावेळी भाजपच्या तिकिटावर विजय

– यावेळीही महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर त्या आता पुन्हा महापौरपदी विराजमान झाल्या.

चंद्रपूर मनपा महापौरपदाच्या आतापर्यंत चारही सोडतीमध्ये महिलांसाठी आरक्षण होतं.

आपली प्रतिक्रिया द्या