
कोरोना संकटकाळात सर्वच क्षेत्रासह शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी काही युवकांनी पुढाकार घेतलाय आणि सोशल डिस्टन्स पाळत शाळा सुरू केली. लॉकडाऊन काळात गावात परतलेल्या सुशिक्षित युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरलाय.
याच गावानं याच शाळेने आपल्याला मोठं केलं. याच शाळेतून शिकल्यावर अभियंता- शिक्षक- पदवीधर होता आलं. आता गावातल्या विद्यार्थ्यांना कोविड काळात हे ज्ञान परत करण्यासाठी काही युवक स्वयंप्रेरणेने शाळा भरवू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या शंकरपूर परिसरातील आंबोली गावात कोरोना काळात गावात परतलेल्या युवकांनी शाळेसमान शिक्षण सुरू केले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होतात. मात्र कोरोना संसर्गाचे भय असल्याने शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. शहरी भागात हे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात मोबाईल संपर्काच्या अडचणी आणि गरीब घटकातील मुलांना मोबाईलचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात आल्यावर आंबोली गावात परत आलेल्या युवकांनी आपला विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर गावातील भिंतींवर गणित- विज्ञान -इंग्रजी या विषयाचे अभ्यास साहित्य रंगवून चक्क मुलांची शाळा भरवली आहे. गेले साडेचार महिने गावातील विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यांच्यात शाळा आणि शिक्षणाचे महत्त्व कायम राहावे यासाठी स्थानिक युवक प्रयत्नशील आहेत. एकीकडे गरीब घटकातील पालकांना यामुळे दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे गावात परतलेल्या युवकांच्या वेळेचा सदुपयोग देखील होत आहे.























































