
चंद्रपूर शहरातील कचरा संकलनाच्या कंत्राटात मनपाने आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी महापालिकेच्या दारातच धरणे आंदोलन केले. निविदा प्रक्रियेत महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने आर्थिक गैरव्यवहार केल्यानं या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या धरणे आंदोलनावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, अश्विनी खोब्रागडे, विनोद दत्तात्रय, चित्रा डांगे, नगरसेवक प्रशांत दानव सह काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
कचरा संकलनाचे जुने कंत्राट संपुष्टात आल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निविदा मागितल्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे यांच्यासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा तांत्रिक पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे. स्वयंभूचा दर सर्वात कमी म्हणजे 1700 रुपये प्रतिमेट्रीक टन होता. यामुळं स्थायी समितीने या संस्थेला काम मंजूर केले.
मात्र, नंतर ही सर्व प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मनपा प्रशासनाने या कामासाठी पुन्हा ई-निविदा मागितल्या. त्यात मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेला तब्बल आठशे रुपयांनी वाढ करीत कंत्राट देण्यात आले. आधी कमी दर टाकणाऱ्या कंत्राटदार कंपनीला लगेच नव्या निविदेत 800 रुपयांची वाढ कशी केली गेली, असा प्रश्न आंदोलकांचा आहे. त्यामुळे यात मोठे अर्थकारण झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केला असून, याची चौकशी करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली.
महापालिकेतील प्रत्येक कंत्राट वादग्रस्तच ठरत असतात. आरोप-प्रत्यारोप होतात. पण अशा वादग्रस्त कंत्राटांची चौकशी मात्र कधीच होत नाही. याही कंत्राटात तेच होण्याची शक्यता अधिक व्यक्त होत आहे.



























































