Chandrapur News: जिल्ह्यातील 87,742 पात्र शेतकरी पिक विमा मदतीपासून वंचित; शेतकऱ्यांनी बजावली कायदेशीर नोटीस

>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

‘पंतप्रधान पीक विमा योजने’च्या अंतर्गत विमा काढला अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, अवर्षण, बोगस बियाणे (विरळ उगवणे) इत्यादीमुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असते. या शेतकऱ्यांच्या पिकांचे कंपन्यांकडून आणि कृषी विभागाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देणे अपेक्षित असते. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळालेले नसल्याने शेतकऱ्यांनी ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक, केंद्रीय व राज्य कृषी विभाग सचिव, जिल्हाधिकारी चंद्रपूर, कृषी अधिकारी आदींना ॲड. दीपक चटप यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.

शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत एक रुपयात पिकांचा विमा काढून मिळत असला तरीही कंपन्यांना जाणार प्रीमियम हा जनतेच्या पैशातूनच शासन भरत असते. मात्र नुकसान झाल्यानंतर उपलब्ध असलेले विमा कवच वेळेत शेतकऱ्यांना मिळत नाही. ओरिएंटल विमा कंपनीच्या जुलै 2024 च्या पत्रानुसार विमा कंपन्यांनी पात्र ठरवलेल्या जिल्ह्यातील 87,742 शेतकऱ्यांचे 133 कोटी 98 लाख 56 हजार 386 रुपये मिळालेले नाही. या शेतकऱ्यांसहित विमा क्लेम करून देखील कंपनीने पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांना देखील 15 दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गजानन लोडे, किशोर डुकरे, शब्बीर सय्यद, नरेश सातपुते, सुनीता शेंबाळे, परमेश्वर वारे, अविनाश डोहे, सत्यशिला हरबडे, वामन ढेंगळे, प्रभाकर कारेकर आदींनी कायदेशीर नोटीस बजावून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करताच त्यांना मदतीपासून अपात्र ठरविले. तसेच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वर्षभरापासून मदत मिळालेली नाही. जनतेच्या निधीतून सरकार प्रीमियम भरत असताना विमा कंपनी मालामाल व शेतकरी बेहाल अशी परिस्थिती दिसते. 2023 पासून प्रतिक्षेत असणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असंही शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं.