चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी, तर एका अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले आहे. पीडितेवर उपचार सुरू असून प्रकरणातील अन्य धागेदोरे पोलीस पडताळून पाहत आहे.
जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना काल (23 ऑगस्ट) उघडकीस आल्यानंतर काही तासातच पोलिसांनी विविध पथके तयार करत पीडितेची ओळख पटवली होती. मनोरुग्ण असलेली ही तरुणी जवळच्याच एका गावात आढळली. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. नागभीड येथील नागरिकांचा रोष बघता या सर्वांना जवळच्याच तळोधी-बाळापूर येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. या सर्व आरोपींसह एक अल्पवयीन आरोपी देखील या प्रकरणात सामील आहे. दरम्यान, पोलिसांनी आज दुपारी या सर्व आरोपींना न्यायालयापुढे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 28 ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन असलेल्या आरोपीला चंद्रपुरात बाल न्याय मंडळापुढे हजर केले गेले. या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणारे आरोपींचे साथीदार व अन्य गुन्हेगारांची माहिती पोलीस काढत आहेत.