शोध सत्याचा – सासूची करणी सुनेची झुरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>चंद्रसेन टिळेकर

एके वर्षी मी कॉलेज विद्यार्थ्यांच्या एका डोंगरावर भरलेल्या एनएसएस पॅम्पमध्ये ‘अंधश्रद्धा’ या विषयावर बोलायला गेलो होतो. संध्याकाळची वेळ. शाळेच्या मोकळय़ा पटांगणात दीडशे-दोनशे विद्यार्थी बसले होते. त्यांच्या दोन्ही बाजूला प्राध्यापक वर्ग खुर्च्या टाकून बसला होता. मी व्याख्यानाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे बोकाळलेली बुवाबाजी, ज्योतिष, वास्तुशास्त्र, अंगात येणे, भूतबाधा या विषयांवर बोलून झाले. शेवटी ‘करणी’ या विषयावर बोलू लागलो तसे माझ्या लक्षात आले दूर खुर्चीवर बसलेल्या एक मॅडम खुर्चीसह अगदी पुढे येऊन बसल्या. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं. कारण तासभर त्या लांबूनच व्याख्यान ऐकत होत्या, मग अचानक त्या पुढे कशासाठी आल्या, असा प्रश्न मला पडला. शेवटी मी ‘करणी’ या विषयावर बोलून व्याख्यान संपवलं. मुलांची प्रश्नोत्तरे संपल्यावर मी आवराआवर करीत असता त्या मॅडम आल्या आणि मला म्हणाल्या,

‘आपल्याशी जरा बोलायचे होते.’

‘बोला ना – काही शंका आहे का?’

‘हो पण इथे सगळय़ांच्या समोर नको, समोरच्या रिकाम्या वर्गात बसून बोलू.’

 एका वर्गात आम्ही समोरासमोरच्या बाकावर बसल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘सर, तुम्ही ‘करणी’ या विषयावर बोलताना म्हणालात की, करणीवर विश्वास ठेवणे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, हे कितपत खरे आहे?’

‘एकशे एक टक्का खरे आहे. हे मांत्रिक लोक अंधश्रद्धाळूंना घाबरवून पैसे उकळण्यासाठी ‘करणी’चा बागुलबुवा करतात. काही तथ्य नाही त्यात!’ एवढं सगळं सांगितलं खरं, पण लेक्चरर बाईंच्या चेहऱयावर काही अपेक्षित प्रतिसाद दिसेना. शेवटी मीच त्यांना विचारलं, ‘माझं बोलणं आपल्याला पटलेलं दिसत नाही.’

‘कसं पटणार? मी स्वतःच ‘करणी’ची शिकार झालेली आहे.’

‘म्हणजे, तुमच्यावर कोणी करणी केलीय असं वाटतंय का तुम्हाला?’

‘हो, मला तसा वाईट अनुभव आलाय आणि अजूनही येतोय.’

‘कोणी केलीय करणी तुमच्यावर?’ मी काहीसे आश्चर्यचकित होऊन विचारलं, तशा त्या म्हणाल्या,

‘माझ्या सासूने माझ्यावर करणी केलीय.’

खरं सांगायचं तर काही क्षण मी अवाकच झालो, पण भानावर येत म्हणालो, ‘मॅडम, तुमच्या सासूने तुमच्यावर करणी करण्याचे कारणच काय?’

‘त्यांचा माझ्यावर असा संशय आहे की, मी त्यांचा मुलगा म्हणजे माझे पती त्यांच्यापासून करणी करून तोडले.’

‘पण असं त्यांना वाटावे असं काही घडलंय का?’

‘त्याचं असं आहे, आमचे केवळ एक वर्षापूर्वीच लग्न झालेले आहे. आमचा प्रेमविवाह झालाय. तो आमच्या सासूबाईंना फारसा पसंत नव्हता, कारण त्यांच्या मनात दुसरीच कोणीतरी मुलगी होती. लग्नानंतर पहिले तीन-चार महिने व्यवस्थित गेले, पण त्यानंतर आमच्यात म्हणजे सासू-सुनेत धुसफूस सुरू झाली.’

‘काय कारण बरं?’

‘त्यांचा माझ्यावर संशय आहे, मी त्यांच्यावर करणी करून त्यांचा मुलगा त्यांच्यापासून तोडला.’

‘हे असं त्या का म्हणतात हे विचारलं नाही तुम्ही त्यांना?’

‘विचारलं ना, तसं त्या म्हणाल्या लग्नापूर्वी माझा मुलगा मला विचारल्याशिवाय काहीही करीत नव्हता. कुठेही जायचं असेल तर माझी परवानगी घेऊन जायचा. त्याला कपडे घायचे असले तरी मला घेऊन जायचा. आलेला पगार सगळा माझ्या हातात ठेवायचा आणि खर्चायला पैसे माझ्याकडे मागायचा. आता हे सगळं त्याने बंद केलं. मला काहीही विचारून करीत नाही. सगळं काही तुला विचारून करतो. नक्कीच तू माझ्यावर करणी केलीय. बऱया बोलाने तू कोणाकडून केली असशील त्याला ती करणी उलटायला सांग नाहीतर मी तुझ्यावर उलटी करणी करीन आणि ती पण अशी की, माझा मुलगा तुझ्याशी फटकून वागेल, बरं तर बरं, तुला सोडूनही देईल. बघ, मीच आता तुझ्यावर करणी करते की नाही ते. सुरुवातीला काही मी एवढं मनावर घेतलं नाही, पण आता तर माझी खात्रीच पटलीय की, माझ्या सासूने माझ्यावर तशी करणी केलीय.’

‘कशावरून?’

‘कारण अलीकडे माझा नवरा पूर्वीसारखा माझ्या सहवासात रमतो असे दिसत नाही. इतपंच काय, तो मला म्हणालादेखील की, तू आता पूर्वीसारखी प्रफुल्लित दिसत नाही; तुझ्यात पूर्वीसारखा चार्म राहिला नाही. आता तर तो आपल्या मित्रातच जास्त रमतो. म्हणजे माझ्या सासूने धमकी दिल्याप्रमाणे तिने खरंच करणी केली असावी. सासूने करणीची धमकी दिल्यापासून मला नीट जेवणही जात नाही.’

मी आतापर्यंत मॅडमचे गाऱहाणे ऐकण्यात दंग असल्याने त्यांच्याकडे नीट पाहिलं नव्हतं. त्यांच्याकडे नीट पाहिल्यावर हे लक्षात आलं की, त्या चांगल्या गौरकाय आहेत, नाकीडोळीही नीट आहेत, पण त्यांचा चेहरा काळजीने मलूल झाल्यासारखा वाटला. शेवटी मी त्यांना निर्धाराने म्हणालो,

‘तुमचे पती जे म्हणतात ते काही चुकीचे नाही‘

‘म्हणजे?’

‘म्हणजे असं की, तुमच्या रूपाचा किंवा दिसण्याचा काहीच प्रश्न नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही आपल्यावर करणी केलीय या भ्रमातून आणि त्यामुळे निर्माण झालेल्या काळजीतून बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही निस्तेजच वाटणार आणि त्यात तुम्ही जेवणही सोडलंय, म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. अहो, देव कशाला कुणाला दुष्ट शक्ती देईल? तो सगळय़ांचं रक्षण करतो असे आपणच म्हणतो ना? तेव्हा करणीबिरणी सब झूट आहे. अहो, करणी करून असा कुणाचे वाटोळे करता येत असते तर आपण या मांत्रिकांना आपल्या शत्रू राष्ट्राच्या विरोधी करणी करून त्यांचा सत्यानाश करायला सांगितले नसते का? तेव्हा हे करणीचं भूत डोक्यावरून उतरवा. उद्यापासून पोटभर खात चला. म्हणजे तुमच्या चेहऱयावर पूर्वीसारखी तकाकी अवतरेल. आनंदी राहा. पतीसमोर नेहमी हसऱया चेहऱयाने जा, अहो हसरी स्त्राr ही जगातलं सगळय़ात जास्त देखणं सुंदर शिल्प असतं, तुमच्या पतीला तुम्ही पूर्वीसारख्याच आवडू लागाल याची शाश्वती मी देतो. आणि हो, तुमच्या सासूला बिनधास्तपणे सांगा की, काय तुमच्यावर करणी करायची असेल ती खुशाल करा म्हणावं. मलाही टिळेकर नावाचा एक बुवा सापडलाय, तो करणी करणाऱयाला आंधळा-पांगळा करून टाकतो.’

लेक्चरर बाईंची कळी खुलली आणि निग्रह करीत म्हणाल्या,

‘सर, मला पटलं; मी करणीच काय, पण डोक्यातल्या सगळय़ा अंधश्रद्धा काढून टाकीन आणि आत्मविश्वासाने पुढची वाटचाल करीन. सर मी आपले आभार कसे मानू?’

मी तत्परतेने म्हणालो,

‘माझा सल्ला अमलात आणून.’

त्यानंतर जवळ जवळ पाच-सहा महिने गेले. माझ्या वाडीतीलच एक मुलगा निगडीतल्या त्यांच्या कॉलेजात क्लार्क म्हणून लागला होता. मी मुंबईहून आल्याचे कळताच तो माझ्या शेतामधल्या घरात आला आणि म्हणाला, ‘भाऊ, त्या पाचाणे गावातल्या पॅम्पमध्ये तुमचे भाषण ऐकायला आल्या होत्या ना त्या बाईंनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिलीय.’

मला त्याने ती चिठ्ठी दिली, त्या चिठ्ठीत त्यांनी लिहिलं होतं,

‘माझ्या संसारात पुन्हा आनंदाचे नंदनवन फुललंय, याचं श्रेय सर्वस्वी आपल्यालाच आहे!’

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)