
जसं ठरलं तसं वागा! आम्ही मागची पाने चाळली तर तुम्हाला बोलणं मुश्कील होईल!!
सिंचन प्रकल्पातील 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निकाल अद्याप लागला नाही. आम्ही मागची पाने चाळली तर तुम्हाला बोलताही येणार नाही. महायुतीत मतभेद निर्माण होतील असं वागू नका. ठरल्याप्रमाणे वागा, असे सांगत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि अजित पवार गटात चांगलीच जुंपली आहे. सिंचन प्रकल्पात 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यासोबत मी सरकारमध्ये सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची चांगलीच कोंडी केली आहे. पत्रकारांनी आज याबाबत मंत्री बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. सिंचन घोटाळा प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून निकाल लागला नाही. न्यायालयाच्या निकालाच्या आधारे पुढे जाता येईल. बोलण्यासारखे खूप आहे; पण आज ते दिवस नाहीत. योग्य वेळी बोलले जाईल, असा सूचक इशारा बावनकुळे यांनी दिला.
आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमेकांविरुद्ध न बोलण्याचे ठरले असतानाही अजित पवार असे का बोलतात याची मला कल्पना नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार अनेक वर्षे सत्तेत होते. आम्ही जर आता त्यांची मागची पानं चाळली तर अजितदादांना काही बोलता येणार नाही. मात्र, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी समन्वय समितीच्या नियमांचे पालन करावे, असे बावनकुळे म्हणाले.
पिंपरीत भाजपला कुणाची गरज लागणार नाही
महापालिका निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजपला कोणाची मदत घेण्याची गरज पडणार नाही. स्वबळावर भाजपचा महापौर होईल. पिंपरी-चिंचवडमध्ये 51 टक्के मते घेऊन दोन तृतीयांश बहुमताने पिंपरी-चिंचवडचा महापौर भाजपचाच होईल, असेही बावनकुळे म्हणाले. शहरात लुटारूंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय. महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरल्यात. भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, अशी टीका अजित पवार यांनी पिंपरीत केली होती.
जेवढे मागे जाऊ तेवढे प्रकरण वाढेल – फडणवीस
कोणी आम्हाला काय काम केले असा सवाल करणार असेल तर त्यांनी आधी आरशात पाहावे. एक दादा बोलत आहेत, दुसरे दादा बोलत आहेत. मात्र आपण जेवढे मागे जाऊ, तेवढे हे प्रकरण वाढेल. भाजपवर आरोप करणाऱयांनी आधी वस्तुस्थिती तपासावी, असा टोला कुणाचेही नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.






























































