Chandrayaan-2 – 98 टक्के यशस्वी, ‘इस्त्रो’प्रमुख सिवन यांच्या दाव्यावर वैज्ञानिकांचे प्रश्नचिन्ह

3377

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक ‘चांद्रयान-2’ (Chandrayaan-2) मोहिमेबाबत इस्त्रो (ISRO) प्रमुख डॉ. के सिवन यांनी शनिवारी माहिती दिली. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा संपर्क झाला नसला तरी ‘चांद्रयान-2’ (Chandrayaan-2) चे ऑर्बिटर योग्य प्रकारे काम करत आहे. ऑर्बिटर चंद्राचे फोटो आणि विविध आकडेवारी पाठवत आहे, असे सिवन म्हणाले. ही मोहीम 98 टक्के यशस्वी झाल्याची माहिती सिवन यांनी दिल्यानंतर संशोधकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सिवन यांच्या ‘चांद्रयान-2’ (Chandrayaan-2) मोहिेमेसंदर्भातील विधानानंतर एका संशोधकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून इस्त्रोचे नेतृत्व आणि ‘रॉकेट सायन्स’वर लेख लिहिला आहे. गंभीर आत्मपरिक्षणाशिवाय असे विधान केल्याने जगभरात आपले हसे होत असल्याचा आरोप या संशोधकाने केला आहे.

इस्त्रो प्रमुखांचे सहयोगी आणि ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ अहमदाबादचे माजी निर्देशक तपन मित्रा यांनी हा लेख सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सिवन यांच्या नावाचा उल्लेख न करत इस्त्रोच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. नेतृत्व करणारे नेहमीच प्रोत्साहन देतात, ते मॅनेज करत नाहीत, असे मिश्रा यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. विशेष म्हणजे सिवन यांची इस्त्रोप्रमुखपदी निवड झाल्यानंतर तपन मिश्रा यांना ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ अहमदाबादच्या निर्देशक पदावरून हटवण्यात आले होते.

तपन मिश्रा आपल्या लेखात म्हणतात, जेव्हा आपली दुचाकीचे टायर पंक्चर होते, तेव्हा आपण ते निट करण्यासाठी एका मेकॅनिकला बोलावतो. तशाच प्रकारे एखाद्या स्पेसक्राफ्टच्या रॉकेटमध्ये गडबड झाली तर मेकॅनिकला विसरून कसे चालणार. स्पेस सायन्स आणि तंत्रज्ञानावर 100 टक्के विश्वास होणे आवश्यक आहे. ते पुढे लिहितात, जेव्हा अंतराळामध्ये एखादे मशिन पाठवले जाते तेव्हा काही सुधारात्मक उपाय करणे गरजेचे असते. कारण अंतरराळामध्ये त्यातील बिघाड निट करण्यासाठी कोणताही व्यक्ती नसतो. अंतराळात पाठवण्यापूर्वी त्या मशिनला तशा वातावरणाचा अनुभव देणे आवश्यक असते.

दरम्यान, तपन मित्रा यांच्या प्रमाणेच अमेरिकेत राहणारे हिंदुस्थानी वंशाचे वैज्ञानिक भरत ठक्कर यांनी विक्रम लँडरच्या गुणवत्तेवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विक्रम लँडरच्या डिझाईनचे पोस्टमॉर्टम करणे आवश्यक आहे. त्याच्या सुरक्षेसाठी कसे डिझाईन करण्यात आले होते आणि कशी व्यवस्था करण्यात आली होती? आणि त्यावर खरंच काम केले गेले होते अथवा नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या