देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे काय? तृणमूलचा सवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेच्या प्रतिनिधींना जर सुरक्षा कर्मचाऱयांकडून मारहाण होत असेल, महिला खासदारांशी पुरुष पोलीस कर्मचारी झटापट करत असतील तर हे कशाचे निदर्शक आहे? देशात सरकारने अघोषित आणीबाणी लादली आहे काय, असा सवाल करत तृणमूल काँग्रेसने आज लोकसभेत सरकारवर टीकेची तोफ डागली. त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळही झाला.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत आजही एनआरसीचा मुद्दा गाजला. त्यात भर पडली ती आसाममध्ये तृणमूल काँगेसच्या खासदारांना अटक केल्याच्या प्रकरणाची. एनआरसीच्या अहवालातून अवैध ठरविल्या गेलेल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे शिष्टमंडळ राज्यसभेतील गटनेते सुखेंदू शेखर राय यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये गेले होते, मात्र या शिष्टमंडळालाच विमानतळावर जेरबंद करण्यात आले. या शिष्टमंडळातील कोकिला दस्तगीर व अर्पिता घोष या महिला खासदारांशी धक्काबुक्की झाल्याचा मुद्दा सभागृहात तृणमूलचे कल्याण बॅनर्जी यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला.

‘तृणमूल’चा आज काळा दिवस
आसामातील सिलचार विमानतळावर गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेऊन धक्काबुक्की करण्यात आल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला ‘काळा दिवस’ पाळण्यात येणार आहे.

‘एनआरसी’वरून सलोखा बिघडवण्याचा डाव -राजनाथ
आसाममधील ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’वरून (एनआरसी) भीतीचे वातावरण आणि सलोखा बिघडवण्याच्या सोशल मीडियावर सुरू झालेल्या कारवायांमागे हितसंबंधितांचा डाव आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केला. कायदा-सुव्यवस्थेसाठी राज्यांना विनंतीनुसार सुरक्षा दले पुरवण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

मीडियाचा आवाज दाबला जातोय; काँग्रेसचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात बोलणाऱया प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इतके दिवस राजकीय पक्षांचा आवाज दाबणारे सरकार आता मीडियाचाही आवाज दाबतेय असा खळबळजनक आरोप काँगेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. शून्य प्रहरात खरगे यांनी ‘एबीपी माझा’ चॅनेलमधून मिलिंद खांडेकर व पुण्यप्रसून वाजपेयी यांची गच्छंति करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये छत्तीसगढमधील महिलांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचा दावा केला होता. एबीपी वाहिनेने पंतप्रधानांच्या या दाव्याची पुरती पोलखोल केली होती व सरकारी अधिकाऱयांच्या दबावापोटी या महिला खोटे बोलल्याचे उघड झाल्याचा राग मनात धरूनच सरकारने दबाव र्अीणल्यामुळे या पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली, असा आरोप खरगेंनी केला.