
काळाचौकी येथील अभ्युदय नगर येथे झाड पडून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नथुलाल मौर्य (48) यांचा मृत्यू झाला तर शोएब फरीद शेख (36) आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मृत्यू झालेले नथुलाल हे या ठिकाणी चप्पल विकत होते. यावेळी त्यांच्यावर झाड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचाराकरिता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संबंधित घटनेची काळाचौकी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मुंबईत झाड पडून जखमी आणि मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
























































