भाजप नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल

पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविकेसह चौघांवर बांगूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेविकेसह चौघांनी दुकानात घुसून तोडफोड करत मारहाण केल्याचा आरोप पाणीपुरी विक्रेत्याने केला आहे.

मालाड पश्चिमच्या एव्हरशाईन नगर येथे महादेव गवळे यांचे पाणीपुरीचे दुकान आहे. त्या दुकानात राधाकांत यादव हे कामाला आहेत. लॉकडाऊन असल्याने ते दुकानाची ग्रिल बंद करून खाद्य पदार्थाचे पार्सल देतात. 20 मे रोजी सायंकाळी गवळे यांच्या दुकानात एक ग्राहक आला. त्याने दुकानातून समोसे पार्सल घेतले. दुकानाबाहेरच त्याने समोसे खाल्यावर तो पाणी प्यायला आणि जवळच त्याने चूळ भरली. तेथून जात असताना हा प्रकार स्थानिक नगरसेविकेच्या लक्षात आला. नगरसेविकेने ग्राहकाला मारहाण करून त्या दुकानात शिरल्या. त्यानंतर नगरसेविकेने तिघांना बोलावून यादव यांना मारहाण केली. मारहाणीवर न थांबता नगरसेविकेने दुकानाची तोडफो़ड करून दुकानात ठेवलेली रक्कम चोरून नेल्याचा आरोप यादव यांनी केला आहे, तर दुसरीकडे नगरसेविकेनेदेखील यादव यांच्याविरोधात बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नगरसेविकेच्या तक्रारीवरून बांगूरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या