‘डेक्कन क्वीन’मध्ये ‘चॅटबॉट’ क्यूआर कोड स्कॅन करताच प्रवाशांपुढे माहितीचा खजिना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते पुणे धावणाऱया ‘डेक्कन क्वीन’ एक्प्रेसचा प्रवास माहितीपूर्ण आणि मनोरंजक करण्यासाठी मध्य रेल्वेने गपशप्स या कंपनीच्या मदतीने गुगल असिस्टंट, अलेक्सा, सिरी याप्रमाणे चॅटबॉटची सुविधा उपलब्ध केली आहे. डेक्कन क्वीनपाठोपाठ दहा एक्प्रेसमध्ये क्यूआर कोड स्कॅन करताच मनोरंजक माहितीचा खजिना खुला होणार आहे. ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’ अंतर्गत हा उपक्रम मध्य रेल्वेने राबवला आहे.

तुम्ही जर डेक्कन क्वीनचे रोजचे प्रवासी असाल तर आता तुमच्या मोबाईलने क्यूआर कोड स्कॅन करताच इन्फोटेन्मेंटचे दालन उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना त्यांचे सामान्यज्ञान तपासायचे असेल किंवा प्रश्नमंजुषा खेळायची असेल तर ही सुविधा उपयोगी ठरून प्रवासातील वेळ मजेत जाण्याची हमी मिळणार आहे. शॉपिंगची ठिकाणे, विविध गेम्स, पुराणकाळातील प्रेमकथा ऐकायच्या असतील, रामायण आणि महाभारतातील कथा ऐकायच्या असतील तुम्हाला तुमच्या भाषेत हा चॅटबॉट सर्व माहिती देणार असल्याने प्रवासाचा वेळ मजेत पार पडणार आहे.