
बीड जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्टवरून ड्युटी करून परत बीडकडे येत असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्ट यांचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.
रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ रविवारी रात्री साडे आठ दरम्यान टाटा सुमो (एमएच 15 बीएन 6436) आणि स्विफ्ट (एमएच 20 बीसी4512)ची धडक होऊन जबर अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत असणारे मात्र, सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर असणारे प्रशांत दिगंबर कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना शिरूर पोलीस ठाण्याचे जमादार शेळके यानी घटनास्थळी तत्काळ जाऊन जखमींना बीड येथील रुग्णालयात हलवले आणि पाटोदा पोलिसांना माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
चेक पोस्टची ड्युटी शेवटची ठरली
या अपघातात ठार झालेले शिक्षक बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानुर येथील चेक पोस्टवर कार्यरत होते. 7.30 वाजता आपली ड्यूटी संपल्यानंतर ते आपल्या स्विफ्ट कारणे बीड येथे आपल्या घरी निघाले होते. रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. चेक पोस्टवरील आजची त्यांची ड्यूटी शेवटची असल्याचे समजते.



























































