तो परत येतोय… 70 वर्षांनी !!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी 

वाघ.. सिंह.. बिबट्या.. चित्ता !! नितांत देखणे, रुबाबदार आशियाई प्राणी. गेल्या 70 वर्षांपासून यातील चित्ता मात्र नामशेष झाला आहे. आपला देश.. राष्ट्र.. अगदी समाजसुद्धा फक्त माणसांनी होत नसतो. पर्यावरण, निसर्ग.. निसर्गातील प्राणीमात्र, निसर्गातील घटक या साऱ्यांनी राष्ट्र.. समाज.. देश समृद्ध, संपन्न बनत असतो.

मुळात आपण सारेच निसर्गाचे घटक आहोत .. आणि एकमेकांवर अवलंबून आहोत.. निसर्गातील बाकी साऱ्या घटकांनी हा निसर्ग नियम विनासायास मान्य केला आहे. अपवाद ठरला आहे फक्त माणूस. कृत्रिम साधने.. संहारक अस्त्रे आणि सतत स्वत:ला श्रेष्ठ समजून निसर्गावर, निसर्गातील प्राणीमात्रांवर कुरघोडी करण्याची मानसिकता माणसाने जोपासली. निष्पाप प्राण्याची हत्या हे त्याचे शिकारीचे छंद ठरले. या भयंकर छंदांतूनच पर्यावरणातील अनेक प्राणी संपले, नामशेष झाले. पण माणसाची हाव मात्र संपलेली नाही.. आजतागायत.शिकारीचे शौक.. छंद.. माणसाचा विकास, नवनवीन साधनांच्या शोधातून .. तथाकथित माणसांसाठी भविष्यकाळात करण्यात येणाऱ्या सुविधांसाठी माणूस केवळ प्राण्यांचीच नव्हे तर निसर्गाचीही अमानुष कत्तल करतो आहे.

या बेमुवर्तखोरपणातूनच हिंदुस्थानची शान असणारा रुबाबदार चित्ता नामशेष झाला. 16 व्या शतकात मुघल बादशाह जहांगीरने पहिल्यांदा चित्ता पाळला. तेव्हा आपल्या देशात एकूण 10,000 चित्ते होते. आणि त्यापैकी 1000 मुघलांच्या दरबारी होते. 20 व्या शतकात त्यांना शिकारीसाठी आयात करण्यात आले. 1799 ते 1968 या कालावधीत हिंदुस्थानातील अरण्यात किमान 230 चित्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानातून नामशेष होणारा हा एकमेव मोठा सस्तन प्राणी आहे. सतत होणारी शिकार, कमी होणारे अधिवास, काळवीट, सांबर, ससे यांची संख्या कमी झाल्यामुळे दुर्मिळ झालेले भक्ष्य या सगळ्या कारणांमुळे चित्ता आपल्या देशातून नामशेष झाला. भक्ष्य दुर्मिळ झाल्याने चित्त्यांनी गावात शिरून पाळलेली जनावरे मारायला सुरुवात केल्याने ब्रिटीशांनी बक्षीस लावून चित्त्यांची शिकार करायला लावली.
त्यानंतर अनेकदा नामशेष झालेल्या चित्त्याचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याला यश आले नाही. पण आता सारे काही ठरविल्याप्रमाणे घडले तर 5 नर आणि 3 मादी असे एकूण 8 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून 8,405 किलोमीटरचा प्रवास करून नोव्हेंबर महिन्यात आपल्याकडे दाखल होतील. संवर्धनासाठी एका मोठ्या मांसाहारी प्राण्याचे एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्यात येण्याची ही पहिलीच घटना आहे. सडपातळ, रुबाबदार, देखणा चित्ता त्याचे भक्ष्य पकडण्यासाठी ताशी 112 किलोमीटर्स वेगाने धावू शकतो. चित्त्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिकारीसाठी हल्ला करताना तो सुसाट वेगाने पळतो.. अचानक थांबतो.. दबा धरून झेप घेतो. जगातील एकूण 7000 चित्त्यांपैकी बहुतेक दक्षिण आफ्रिका, नामिबियात आढळतात.

एखाद्या प्राण्याला अधिवासात पुन्हा वसवण्यात कायमच काही धोके असतात. पण चित्ता आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे. पण तसेच चित्ता हा नाजूक प्राणी आहे. सिंह, वाघ, तरस हे प्राणी त्याच्यावर हल्ला करतात. त्याच्या पिल्लांना यांच्यापासून धोका असू शकतो. चित्त्याच्या भिडस्त स्वभावामुळे त्यांना त्यांच्या शिकारीचे, पिलांचे रक्षण करता येत नाही. चित्त्यांचा कल संघर्ष टाळण्याकडे असतो. म्हणूनच कुंपण असणाऱ्या संरक्षित जागेत चित्ते सुरक्षित असतात. आता चित्ते मध्य प्रदेशातील अभयारण्यात आणण्यात येणार आहेत.