चेन्नई-हैदराबाद आमनेसामने

सामना ऑनलाईन। चेन्नई

चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. सनरायझर्स हैदराबादला मागील दोन लढतींत दमदार विजय मिळालेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही संघ आज चेन्नईत एकमेकांना भिडणार आहेत. एकीकडे चेन्नई सुपरकिंग्जचा संघ आठव्या विजयासह प्लेऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल, तर दुसरीकडे सनरायझर्स हैदबादचा संघ सहाव्या विजयासह आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

चेन्नई सुपरकिंग्जसाठी स्टार्स फलंदाजांचे अपयश डोकेदुखी ठरत आहे. फाफ डय़ुप्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायुडू व सुरेश रैना या दिग्गज खेळाडूंना अधूनमधून चांगली कामगिरी करता आली आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरील जबाबदारी वाढलीय. शार्दूल ठाकूर, दीपक चाहर, रवींद्र जाडेजा यांनी गोलंदाजीत समाधानकारक कामगिरी केलीय. आता चेन्नई सुपरकिंग्जला सांघिक कामगिरीत बाजी मारावी लागणार आहे अन्यथा पराभवाची हॅटट्रिक त्यांची वाट बघत असेल.

डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टॉ या सलामी जोडीच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत आपला ठसा उमटवलाय. अर्थात त्यांच्याही मधल्या फळीला मनाजोगती कामगिरी करता आलेली नाही. भुवनेश्वर कुमारला इतर गोलंदाजांनी साथ द्यायला हवी. संघातील परदेशी खेळाडू वर्ल्ड कपच्या आधी सरावासाठी आपापल्या संघाकडे रवाना होतील. याचा फटका आयपीएलमधील संघांना बसू शकतो. यावेळी याही बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आजची आयपीएल लढत

चेन्नई सुपरकिंग्ज-सनरायझर्स हैदराबाद
चेन्नई, रात्री आठ वाजता