
देव किंवा मूर्ती मानवाला कधीही हानी पोहोचवत नाही. अशा समजुती केवळ अंधश्रद्धा आहेत आणि त्या ‘भक्ती’ किंवा ‘विज्ञान’ यांपैकी कशातही बसत नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षण मद्रास हायकोर्टाने नोंदवले.
उत्तर चेन्नईतील रहिवाशी ए. कार्तिक यांनी त्यांच्या घरात शिवशक्ती दक्षिणेश्वरी, विनायक आणि वीरभद्र या देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. ही पूजा प्रामुख्याने खासगी स्वरूपाची होती, परंतु परिसरातील काही लोकही त्यात सहभागी होत असत. मात्र या मूर्तींच्या स्थापनेनंतर परिसरात काही ‘अनैसर्गिक मृत्यू’ झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने या मूर्ती हटवल्या होत्या.
कार्तिक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती डी. भरत चक्रवर्ती यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, मूर्तींची पुन्हा स्थापना झाली तर स्थानिक रहिवाशी हिंसाचार आणि मालमत्तेची नासधूस करण्याची धमकी देत आहेत, त्यामुळे पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे. तर राज्य सरकारचा युक्तिवाद असा होता की, याचिकाकर्त्याला केवळ निवासी घर बांधण्याची परवानगी होती. त्याने परवानगीशिवाय त्याचे मंदिरात रूपांतर केले आहे. येथे मध्यरात्रीसह विचित्र वेळी पूजा केल्या जात होत्या, ज्यामुळे परिसरातील लोकांना त्रास होत होता.
काय म्हणाले न्यायालय…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. भरत चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले की, अधिकाऱयांनी केलेली कारवाई कायद्याने, धार्मिक श्रद्धा किंवा ‘विज्ञाना’च्या कोणत्याही तत्त्वाने समर्थित नाही. संविधानानुसार राज्यावर जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आहे. प्रशासन अशा अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतींना थारा देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत याचिकाकर्त्याला तत्काळ मूर्ती परत कराव्यात, असा आदेश न्यायमूर्ती डी. भरत चक्रवर्ती यांनी दिला. तसेच याचिकाकर्त्याने पूजेमध्ये लाऊडस्पीकर, ध्वनी प्रदूषण, शेजाऱयांना त्रास किंवा जनतेकडून पैसे गोळा करणे आदी कृत्य करू नयेत. तसेच याचिकाकर्त्याच्या जागेवर कोणतेही अनधिकृत बांधकाम असेल, तर त्यावर कायद्यानुसार स्वतंत्रपणे कारवाई केली जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.



























































