हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाची ताकद अवघ्या जगाला दाखवणारे चेतन पाठारे यांची पुन्हा एकदा हिंदुस्थानी शरीरसौष्ठव महासंघाच्या (आयबीबीएफ) सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे. जागतिक शरीरसौष्ठव महासंघ अर्थातच वर्ल्ड बॉडीबिल्डिंग आणि फिजिक स्पोर्टस् महासंघ (डब्ल्यूबीपीएफ), तसेच दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव महासंघाचे (एसएबीपीएफ) सरचिटणीसपदही तेच सांभाळत आहेत. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात आपल्या दमदार नेतृत्वामुळे हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाचे जागतिक पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करणाऱया पाठारेंना आता एकाच वेळी राष्ट्र, खंड आणि विश्व असे तिन्ही लोकांचे नेतृत्व करावे लागणार आहे.
गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ शरीरसौष्ठव खेळाची धुरा सांभाळणाऱया पाठारे यांनी सर्वप्रथम 2011 साली ‘आयबीबीएफ’चे सरचिटणीसपद सांभाळले होते. त्यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने अनेक जागतिक स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन करून अवघ्या जगाला आपली ताकद दाखवली होती. त्याचबरोबर 2014 साली मुंबईत ‘मि. युनिव्हर्स’ जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे ‘न भूतो न भविष्यति’ असे आयोजन करून जागतिक पातळीवर हिंदुस्थानचा दबदबा निर्माण केला होता. शरीरसौष्ठवाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन स्पर्धांचे देखणे आयोजन करण्याचा हातखंडा असलेल्या पाठारे यांच्या कल्पक आणि धडाडीच्या नेतृत्वामुळेच दुभंगलेल्या शरीरसौष्ठव संघटनांना एकीचे बळ देण्याचे प्रयत्न ते आजही सक्षमपणे करत आहेत. चार वर्षांपूर्वी हिरल शेठ यांच्याकडे ‘आयबीबीएफ’ची सूत्रे सोपवली होती, मात्र हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाच्या प्रेमाखातर पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे शिवधनुष्य स्वीकारले आहे.
‘आयबीबीएफ’ची नवी कार्यकारिणी
अध्यक्ष – रमेशकुमार स्वामी ; कार्यकारी उपाध्यक्ष – प्रेमचंद डेगरा; उपाध्यक्ष – अनुप सिंग, सुभाष भदाना, सुमित्रा त्रिपाठी, टी.व्ही. पॉली, थंडाथिल तुलसी; सरचिटणीस – चेतन पाठारे ; सहसचिव – अतिन तिवारी, हिरल शेठ ; कोषाध्यक्ष – नवनीत सिंह ; आयोजन सचिव – अजित सिद्दनवार, के. बालामुरुगन, एन. रतन सिंह, विश्वास राव ; सदस्य – के. आनंदन, पेमा भुतिया.