मेफेड्रॉन, बटन गोळ्यांच्या तस्करीचे रॅकेट पकडले, ट्रॅव्हल्स जप्त; अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाची धडाकेबाज कारवाई

मुंबईत बसून शहरात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या रॅकेटचा अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पथकाने 5 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर, 102 न्याट्रोसन, 10 गोळ्यांसह ट्रॅव्हल्स बस असा एकूण 20 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शहरातील नशेखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतंत्र अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाची स्थापना केली आहे. या पथकाची जबाबदारी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शहरात वाढत असलेला नशेचा बाजार रोखण्यासाठी पथकातील सर्वच पोलीस कर्मचारी कसून कामाला लागले आहेत. शहरात नशेच्या गोळ्या तसेच मेफेड्रॉन पावडर कोणत्या मार्गाने दाखल होतात याचा शोध पथकातील पोलीस अंमलदार घेत होते.

या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मुंबईवरून येणारी सन बस ट्रॅव्हल्सच्या राजवीर ट्रॅव्हल्स बस (एनएल 01 बी 1906) मध्ये नशेच्या गोळ्या तसेच मेफेड्रॉन पावडर येणार आहे. या माहितीच्या आधारे शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार सांगण्यावरून हे लालाखान पठाण, सतीश जाधव, संदिपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, ऋषीकेश शेळके व छाया लांडगे यांच्या पथकाने छापा मारला असता मुंबईवरून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून चालक शब्बीर शफी शेख (42, रा. रेल्वे स्टेशन) व क्लीनर अफरोज निजाम खान (26, रा. नेहरूनगर, कटकटगेट) यांच्याकडे पार्सल घेण्यासाठी आलेला सिकंदर खाजा शेख (32, रा. पटेलनगर, गल्ली नंबर 8, नारेगाव) यांना झडप मारून पकडले.

यावेळी मिठाईच्या पाकिटात 102 बटन गोळ्या व मेफेड्रॉन पावडर आढळून आली. पोलिसांनी बसची झडती घेतली असता त्यात चाकू, मोबाईल व बस असा एकूण 20 लाख 42 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. या ट्रॅव्हल्समधील अझहर खान याच्या पार्सल मुंबईहून आणत असल्याची माहिती बसचालकाने दिली. मुंबईतून हे पार्सल नगमा शेख ऊर्फ बाजी (रा. मुंबई) हिच्याकडून येत असल्याची माहिती सिकंदर शेख याने दिली. या प्रकरणी पोलिसांनी सना बस एजन्सीचे अझहर खान, चालक शब्बीर शेख, क्लीनर अफरोज खान, मुख्य आरोपी सिकंदर शेख, मुंबई येथील नगमा शेख ऊर्फ बाजी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी होते गोळ्या, मेफेड्रॉनची विक्री

नगमा शेख ऊर्फ बाजी ही मुंबईत बसून शहरातील नशेचे रॅकेट चालवित आहे. त्यासाठी सिकंदर शेख हा तिला ऑनलाईन पैसे पाठवित होता. पैसे मिळाल्यानंतर राजवीर ट्रॅव्हल्स बसमध्ये मिठाईच्या बॉक्समध्ये हे पार्सल शहरात दाखल होत होते. मात्र, याची खबर पथकाला लागल्याने हे रॅकेट उघड झाले आहे.

मेफेड्रॉन पावडरची विक्री 5 हजार रुपये तोळा!

मेफेड्रॉन पावडरचा वापर हा नशा करण्यासाठी केला जातो. सध्या या पावडरचा सर्रास वापर केला जात आहे. मुंबईहून 10 हजार रुपयांमध्ये 102 बटन गोळ्या व 5 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर घेतली जाते. शहरात हे मेफेड्रॉन 4 ते 5 हजार रुपये तोळा, तर 10 बटन गोळ्या 1200 रुपये दराने विक्री केल्या जातात. त्यामुळे या धंद्यात उतरणाऱ्यांची संख्या वाढत असून, नशेखोरांचे प्रमाणही वाढले आहे.