एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून व्यापाऱ्याचा खून; मृतदेह चाळीसगाव घाटात फेकला, पाच आरोपींना अटक

सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील प्रगतिशील शेतकरी व भुसार व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये खंडणीसाठी अपहरण केले. खंडणी न दिल्याने खून करून त्यांचा मृतदेह चाळीसगाव-कन्नड रस्त्यावरील घाटात १०० फूट खोल दरीत फेकून देऊन पुरावा नष्ट केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. सोमवारी पहाटे ४ वाजता हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी खून करणाऱ्या ५ आरोपींना रविवारी रात्री ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर सापळा रचून जेरबंद केले. तुकाराम माधवराव गव्हाणे (५५, रा. बोदवड, ता. सिल्लोड) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. मयताचे काका उत्तमराव गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी दुपारी ३ वाजता दरोडेखोर आरोपी सचिन नारायण बनकर (२५), वैभव समाधान रानगोते (२३, दोघे रा. गोळेगाव), अजिनाथ ऊर्फ अजय रखमाजी सपकाळ (२२, रा. पालोद), विशाल साहेबराव खरात (२३, रा. पानवडोद), दीपक कन्हैयालाल जाधव (२५, रा. लिहाखेडी) या पाच जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

तुकाराम गव्हाणे यांना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता उंडणगाव ते बोदवड रस्त्यावर मोटारसायकल रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत १ लाख रुपये हिसकावले. अधिक पैशाच्या लालसेपोटी त्यांना एका कारमध्ये बळजबरी बसवून अपहरण केले. त्यांचा मुलगा कृष्णा व काका उत्तमराव गव्हाणे यांच्याकडे अपहरण केलेल्या दरोडेखोरांनी तुकाराम गव्हाणे यांच्या फोनवरून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. खंडणी रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस्थानक व नंतर बाबा पेट्रोलपंपाजवळ अशा ठिकठिकाणी ठिकाण बदलून आणून देण्याची मागणी करण्यात आली होती.

पण पैशाची जुळवाजुळव करण्यास वेळ झाल्याने ३ वाजेपर्यंत खंडणी मिळाली नाही म्हणून दरोडेखोरांनी २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता चाळीसगाव घाटात म्हसोबा मंदिर खोलदरीजवळ तुकाराम गव्हाणे यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकून दिला. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चार दिवसांची पोलीस कोठडी

तुकाराम माधवराव गव्हाणे यांचा खून करणाऱ्या वरील पाचही आरोपींना अजिंठा पोलिसांनी सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाचही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी मिळाल्याने पोलिसांना आता या खुनाच्या कटात अजून कोणी आरोपी आहे का? अपहरण फक्त खंडणीसाठी केले की अजून आरोपींचा काही उद्देश होता का, अशा विविध गोष्टी तपासात स्पष्ट होणार आहेत. आरोपींकडून पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलेले हत्यार, चाकू, छऱ्याची पिस्तूल व मयताकडून लुटलेले ८० हजार ५०० रुपये रोख, एक कार जप्त केली.

वकील पत्र घेण्यास वकील संघाचा नकार

ही घटना अतिशय क्रूर व निंदनीय आहे, असे समाजकंटक यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे म्हणत सिल्लोड वकील संघाने आरोपींचे वकील पत्र घेऊ नये असे आवाहन केल्याने कोणत्याही वकिलाने आरोपींचे वकील पत्र घेतले नाही. त्यामुळे लिगलहेडमार्फत आरोपींना वकील पुरवले.