
उपऱ्यांचं चांगभलं करण्यासाठी भाजप नेत्यांनी निष्ठावंतांच्या भावना पायदळी तुडवल्या. उमेदवारी नाकारल्याचे कळताच लाडक्या बहिणींनी भाजप कार्यालय गाठले. कुणी पेट्रोल ओतून घेतले, कुणी शिव्याशाप दिले, कुणाला भोवळ आली. भाजपच्या इच्छुक महिला कार्यकर्त्यांनी आक्रोश करून कार्यालय डोक्यावर घेतले. राडा होताच प्रचार कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तरीही महिलांची रडारड थांबली नाही. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढले. महिला कार्यकर्त्यांचा रुद्रावतार पाहून मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड मागच्या दाराने पळून गेले. नेते पळून जात असल्याचे पाहून कार्यकर्तेही त्यांच्या गाडीमागे पळाले. भाजप कार्यालयात दिवसभर हा पळापळीचा खेळ चालू होता.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी दहा बैठका घेतल्यानंतर आज सकाळी भाजप आणि मिंधेगटाने एकमेकांच्या नावाने बोटे मोडत काडीमोड घेतला. त्यानंतर सर्व 115 उमेदवारांना तातडीने भाजप कार्यालयात एबी फॉर्म घेण्यासाठी येण्याचा सांगावा धाडण्यात आला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड हे एबी फॉर्म घेऊनच बसलेले होते. भाजपमध्ये आलेल्या उपऱयांना अगोदर एबी फॉर्म देऊन रवाना करण्यात आले. आपल्याला डावलून उपऱयांना संधी देण्यात आल्याचे पाहून भाजपच्या निष्ठावंतांमध्ये संतापाची लाट उसळली. संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठून अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांना जाब विचारला. ‘‘पक्षासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या, गुन्हे अंगावर घेतले, परंतु आमच्या निष्ठsची माती करण्यात आली. दारोदार फिरून आम्ही पक्ष वाढवला, आता आयत्या रेघोटय़ा मारायला आलेल्या उपऱयांना तिकिट दिले. हा निष्ठावंतांवर अन्याय आहे, देवाभाऊ, तुमच्या लाडक्या बहिणींवर तुमच्या डोळय़ादेखत अन्याय होत आहे…’’ असा संताप व्यक्त करताना महिला कार्यकर्त्यांना रडू फुटले. नाराजांच्या संतापाचा स्फोट झाल्याने भाजप कार्यालयात एकच हलकल्लाकोळ उडाला. घोषणाबाजी सुरू झाली, तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. रडारड करणाऱया दिव्या मराठे, लता दलाल, सुवर्णा बताडे, संध्या कापसे यांना पोलिसांनी बाहेर काढले. या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यातच एक कार्यकर्ती हातात पेट्रोलची बाटली घेऊन बाहेर पळाली तिला आवरण्यासाठी पोलीसही पळाले. त्यानंतर वर्षा साळुंके, शालिनी बुंदे यांनीही तिकिट न मिळाल्याने संताप व्यक्त केला.
कोटय़वधी रुपये घेऊन तिकिटे विकली
भाजपच्या लता दलाल यांनी स्थानिक नेत्यांनी कोटय़वधी रुपये घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप केला. आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगताना सुवर्णा बताडे या चक्कर येऊन कोसळल्या. तर संध्या कापसे यांना तिकीट नाकारल्याने अश्रू अनावर झाले. भाजप वाढवण्यासाठी आम्ही घेतलेल्या कष्टाचा या नेत्यांनी अपमान केल्याची भावनाही या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सावे, कराडांची पळापळ
तिकिट नाकारलेल्या नाराजांनी थयथयाट सुरू केल्याने मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांची तंतरली. तणाव वाढत असल्यामुळे पोलिसांनी सावे, कराडांना मागच्या दाराने बाहेर पडण्याचा सल्ला दिला. गोंधळातच एबी फॉर्मचे वाटप करून सावे, कराडांनी मागच्या दाराने पळ काढला. सावे, कराड निघून जात असल्याचे पाहून कार्यकर्तेही त्यांच्या पाठीमागे पळाले.
































































