आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्वांनी एकत्र यावे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे आवाहन

आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा समाजातील सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. नाशिकच्या संभाजीनगररोडवर मधुरम हॉल येथे शनिवारी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज व्यथित आहे, दुःखी आहे. असे सांगून ते म्हणाले की, हा प्रश्न सोडविण्यासाठी समाजाचे सर्व प्रमुख घराणे, आमदार, खासदार, नेतेगण या सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जे एकत्र येणार नाहीत त्यांच्याबाबत समाज निर्णय घेईल. सर्वांनी एकत्र यावे यासाठी माझा नेहमीच पुढाकार असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सकल मराठा समाजाची समन्वय समिती जो निर्णय घेईल, त्याला मी बांधिल राहील. याबाबतचा अजेंडा, आंदोलनाची दिशा हे सर्व समन्वय समिती ठरवील. मी 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. बहुजन समाज आणि मराठा समाज एकत्र यावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे, मला ते महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले समतेचे राज्य असावे यासाठी माझे प्रयत्न आहेत. यासाठी बहुजन व मराठा समाज एकत्र येणे गरजेचे आहे.
या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, श्रीमंत यशराजे भोसले, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार नितीन भोसले, सुनील बागुल, नाना महाले, अद्वय हिरे, अर्जुन टिळे, वत्सला खैरे, अमृता पवार, शिवाजी चुंबळे, मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, ऍड. शिवाजी सहाणे, माधवी पाटील आदींसह कायदेतज्ञ, तसेच राज्यभरातील समन्वयक उपस्थित होते.

सर्वपक्षीय खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेणार
मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट नाकारली, हे म्हणणे चुकीचे आहे. मी एकटा कधीही त्यांना भेटू शकतो. छत्रपतींना भेट नाकारण्याचे त्यांच्यात काय धाडस आहे, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले. परंतु मी एकटा जावून भेट घेणे हा स्वार्थ आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार यांना घेवून मी पंतप्रधानांकडे जाणार आहे. यासंदर्भात कोरोनामुळे मला उत्तर आले नसेल. सर्वपक्षीय खासदारांची पंतप्रधानांशी भेट होईल, त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या