महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग अडकला टक्केवारीत, छत्रपती संभाजीराजे यांचा आरोप

726

रायगड किल्ल्याकडे येणारा महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग हा टक्केवारीत अडकला असल्याने एम बी पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी उद्दिग्नपणे केली आहे. तसेच रोपवे चालकाच्या मनमानी कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. रायगड किल्ल्याकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग हा हेरिटेज रस्ता व्हावा अशी मागणीही छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवली.

अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी रायगड किल्ला प्राधिकरण कामात चाललेल्या चालढकलपणा वर आपली नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदे आधी झालेल्या रायगड प्राधिकरण बैठकीत अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या महाड रायगड किल्ला या राष्ट्रीय महामार्गाच्या 24 किलोमीटर रस्त्याचे 147 कोटीचे काम एम बी पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. मात्र या रस्त्याच्या कामाला दोन वर्ष होऊनही अद्याप सुरुवात झालेली नाही मात्र ठेकेदारामध्ये टक्केवारी वाटण्यात आघाडी घेतली आहे. एम बी पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला भेटलेले काम हे अजून दोन सब ठेकेदारांना दिले असून त्यातून साडे सोळा टक्के टक्केवारी काढण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतचे ठोस पुरावे असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच रस्त्याचे काम हे एम बी पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीनेच करावे अन्यथा या कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या