छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश, युनेस्कोकडून प्रमाणपत्र प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या आणि जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी घटना आज घडली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले. राजगड आणि रायगड या स्वराज्याच्या दोन राजधान्यांसह तामीळनाडूच्या जिंजीपर्यंतच्या प्रमुख किल्ल्यांचा त्यात समावेश आहे.

परकीय आक्रमणे परतवून लावून हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा यासाठी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय प्रतिनिधी मंडळ फेब्रुवारी 2025 मध्ये फ्रान्सला गेले होते. त्यांनी पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तिवाद केला होता. त्याला यश मिळाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले म्हणजे केवळ दगडी वास्तू नसून, हिंदुस्थानच्या इतिहासातील लष्करी व राज्यकारभाराचा अद्वितीय नमुना मानला जातो. 11 जुलै 2025 रोजी युनेस्कोच्या 47 व्या अधिवेशनात ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. त्यासंदर्भातील अधिकृत प्रमाणपत्र शेलार यांनी युनेस्कोच्या मुख्यालयात स्वीकारले.

युनेस्को मुख्यालयात बाबासाहेबांना अभिवादन

हिंदुस्थानच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त त्या पुतळ्याची स्थापना पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात करण्यात आली. आशिष शेलार यांनी त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले.