वाशी शहरात रोपांतून साकारली शिवप्रतिमा; 9 हजार रोपांचा केला वापर

948

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र थाटामाटात साजरी होत असते. प्रत्येकजण आपआपल्या विचाराने वेगळ्या पध्दतीने ही शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. वाशी येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व नवनिर्माण मित्रमंडळाच्या वतीने असाच वेगळा उपक्रम राबविण्यात आला असून तब्बल 9 हजार रोपांचा वापर करुन शिवप्रतीमा साकारण्यात आली आहे. ही शिवप्रतीमा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राजकुमार कुंभार या कलाकाराने साकारली आहे. आजपासून शिवप्रेमी नागरीकांसाठी ही प्रतिमा पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपतींच्या रयतेच्या स्वराज्यातील वैचारिक, सामाजिक, वृक्ष संवर्धन बांधिलकीच्या विचारांचा या शिवजयंतीच्या निमित्ताने जागर करत, छत्रपती शिवाजी महाराजांची 9000 रोपांच्या माध्यमातून प्रतिमा साकारण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी रात्री 9 हजार रोपांच्या मांडणीतून प्रतिमा साकार करण्यात आली असून शिवप्रेमींसाठी 16 फेब्रुवारी सकाळपासून पहाण्यासाठी खुली करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी या प्रातिमेतील रोपांचे शिवप्रेमींना वृक्ष लागवडीसाठी वितरित करून, शिवरायांच्या वृक्ष संवर्धनाच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व नवनिर्माण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही संकल्पना मांडण्यात आली असून प्रतिमा साकारलेला कलाकार राजकुमार दत्तात्रय कुंभार (शिराढोण) यांचा हा पाचवा विक्रम आहे. जगातल्या सर्वात लहान रंगोळीचे पोट्रेट तसेच बाबासाहेब आंबेडकर यांची पोट्रेट, शिवाजी महाराजांची लीड पेंसिल शिल्पाची कलाकृती आणि 5200 पुस्तकांच्या माध्यमातून संत गोरोबा काका यांची बनवलेली प्रतिमा अशा अनेक प्रकारचे विक्रम या कलाकाराच्या नावावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या