
जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना ओलीस ठेवून ग्रामस्थांनी जबर मारहाण केली. ग्रामस्थ एवढय़ावरच थांबले नाहीत तर या तिघांना अर्धनग्न करून गावभर फिरवले. एवढे सर्व होऊनही पोलिसांनी मात्र या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने छत्तीसगड उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती रवींद्र कुमार अग्रवाल यांच्या खंडपीठाने न्यायिक आदेशांचे पालन न केल्याबद्दल व निष्पक्ष चौकशीत निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांच्या कार्यप्रणालीची गंभीर दखल घेतली आहे.
खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना पोलीस महासंचालकांना दोषी अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचा अहवाल शपथपत्रासह सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. हे प्रकरण रायपूर जिह्यातील अभानपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मागील वर्षी 13 मार्च रोजी तिलक साहूवर गावकऱ्यांनी काळी जादू केल्याचा आरोप लावून मारहाण सुरू केली, जेव्हा वडील अमर सिंग साहू आणि भाऊ नरेश साहू त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले, तेव्हा जमावाने तिघांनाही लक्ष्य केले. ग्रामस्थांनी या तिघांनाही बेदम मारहाण करत त्यांना अर्धनग्न करून गावभर फिरवले. त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले. त्यांना चपलांचा हार घातला आणि रात्रभर चौकात ओलीस ठेवले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, परंतु पोलिसांनी पीडित व्यक्तींच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि तक्रार न करण्याचे त्यात लिहिले. उच्च न्यायालयाने या घटनेला मॉब लिंचिंगशी संबंधित गंभीर प्रकरण मानून एसपी, आयजी आणि डीजीपी यांच्याकडून उत्तर मागवले.

























































