माणसाने बकरा कापला, बकऱ्याच्या डोळ्याने माणूस मेला; विचित्र घटनेची सर्वदूर चर्चा

छत्तीसगडमध्ये माणसाने आधी बकरीला मारले आणि नंतर बकरीच्या डोळ्याने माणसाला मारल्याची विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगडमधील एका 50 वर्षीय व्यक्तीने आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर त्याने बकऱ्याचे मटण बनवले आणि तो आपल्या गावकऱ्यांसोबत शिजवलेले मांस खायला बसला. यावेळी या माणसाने बकरीचा शिजलेला एक डोळा उचलला आणि तो खायला सुरुवात केली. मात्र हा डोळा त्याचा घशात अडकला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील ही घटना घडली असून बगर साई (50) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याने मंदिरात बकरा अर्पण करण्याचे ठरवले. मदनपूर गावातील इतर रहिवाशांसह बागर साई हा रविवारी खोपा धाम येथे पोहोचला यावेळी त्याने बकऱ्याचा बळी दिला.

बलिदान विधी पार पडल्यानंतर गावकरी बकऱ्याचे मांस शिजवून जेवायला बसले. बगरने शिजलेल्या मांसातून बकऱ्याचा डोळा उचलला. मात्र नकळत तो त्याच्या घशात अडकला. बकऱ्याचा डोळा बगरच्या घशात अडकल्याने त्याचा श्वास गुदमरला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.