चिकन बिर्याणी मोफत मिळणार, बर्ड फ्ल्यूची भीती घालविण्यासाठी चिकन महोत्सवाचे आयोजन

बर्ड फ्लूच्या भीतीने अनेक खवय्यांनी चिकन खाणे टाळले आहे. व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत नाही. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याकरिता पेण येथे आज शुक्रवार दि.22 जानेवारी रोजी रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने पेण नगरपरिषदेच्या मैदानावर ‘चिकन महोत्सव’आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते 9 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात चिकन लॉलीपॉप, चिकन लेगपीस, चिकन बिर्याणी व अंड्यांच्या पदार्थांचा मोफत आस्वाद देण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक सर्व निर्बंध कटाक्षाने पाळून या चिकन महोत्सवात ब्रॉयलर कोंबडीचे पदार्थ विशेष निमंत्रिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चिकन फेस्टिवलमध्ये अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मान्यवरांनी चिकनचे विविध पदार्थ खाल्ल्याने नागरिकांच्या मनातील बर्ड फ्लूची भीती निघून जाईल व पुन्हा कोंबड्यांच्या व्यवसायाला तेजी येईल असा विश्वास रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर व सचिव दीपक पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या संचालकांनी विशेष मेहनत घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या