Recipe – घरच्या घरी असे बनवा ‘चिकन मोमोज’

3594

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील लोक हादरले आहेत. आरोग्य आणि प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यावर सर्वांनीच लक्ष केंद्रित केले आहे. चांगले आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचा आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश करू शकतो. यामध्ये फिश, चिकन, दूध, अंडी, तसेच काही शाकाहारी पदार्थांचा समावेश होतो. मांसाहारी लोकांमध्ये चिकन सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे.
‘गोदरेज रियल गुड चिकन’च्या सहकार्याने सेलेब्रिटी शेफ वरुण इनामदार यांनी आज आपल्यासाठी ‘चिकन मोमोज’ची खास रेसिपी आणली आहे.

साहित्य –

आवरण बनविण्यासाठी 
1 वाटी मैदा, दोन तृतियांश कप पाणी, चवीपुरते मीठ
4 मोठे चमचे गव्हाचे पीठ (वरून लावण्यासाठी)

सारण बनविण्यासाठी -पाव किलो चिकनचा खिमा,
1 चमचा बारीक कुटलेला लसूण, 100 ग्रॅम लाल कांदे, बारीक चिरलेले, 100 ग्रॅम मशरुम, बारीक केलेला (आवडत असल्यास), मीठ आवश्यकतेनुसार, 1 मोठा चमचा गोडेतेल, अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड

कृती –

कणीक बनविणे –
1. मैदा व थोडे मीठ घ्या. एकमेकांत चांगले मिसळा.
2. पाण्याला उकळ्या येईपर्यंत ते तापवा.
3. हे उकळलेले पाणी मैद्यामध्ये घाला. मिसळून घ्या.
4. कणीक घट्ट मळून ती मऊसर बनवा.
5. ओल्या कपड्यामध्ये ही कणीक बांधून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा.

सारण बनविणे –
1. दुसऱ्या एका भांड्यात, सारणासाठीचे सर्व जिन्नस एकत्र करून ढवळा व बाजूला ठेवून द्या.

सारण भरणे व वाफवणे –
1. कणीक पुन्हा परातीत काढून तिंबून घ्या.
2. कणकेचा रोल तयार करा आणि 2 सेंटीमीटर लांबीचे गोळे कापा. या गोळ्यांच्या 4 इंच व्यासाच्या पुऱ्या लाटा. पुऱ्यांवर वरून लावण्यासाठी गव्हाचे पीठ वापरा.
3. पुरीच्या मध्यभागी थोडे सारण ठेवा. पुरीच्या कडांना पाण्याचा हात लावा आणि बोटांच्या चिमटीत पकडून त्यांचा द्रोण बनवा. यापूर्वी कधीही हे काम केलेले नसेल, तर ही कृती सावकाश, काळजीपूर्वक करा. या द्रोणाच्या कडा एकमेकांवर दाबून अर्धचंद्राकृती करंजी तयार करा. करंजीच्या कडांवर कटर किंवा उलथने फिरवून त्यांचा आकार व्यवस्थित गोल करून घ्या.
4. कढईत एक कप पाणी घ्या. त्यावर चाळणी उलटी ठेवा किंवा स्टीमर वापरा.
5. चाळणीवर कोबीची पाने किंवा बटर पेपर अंथरा.
6. त्यावर आकार देऊन झालेले मोमोज् सावकाश ठेवा. चाळणीवर मोमोजची गर्दी होऊ देऊ नका.
7. कढईवर झाकण ठेवा. गॅसची आच मोठी ठेवून मोमोज 12 मिनिटे वाफवून घ्या.
8. गरम असतानाच हे मोमोज सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या