चिखली : 5 हजार विद्यार्थ्यांनी सादर केले देखावे, भव्य गणेश विसर्जन मिरवणूक

चिखली येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी आज श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत ७० समाजप्रबोधनात्मक देखावे सादर केले. दीड किलोमीटर पर्यंत देखाव्यांची रांग होती. हे देखावे पाहण्यासाठी चिखली शहरातील संपूर्ण रस्त्याच्या कडेला चिखली व परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाने देखील कौतूक करत महाराष्ट्रात ही गणेश विसर्जनाची विद्यार्थ्यांची अभिनव मिरवणूक असल्याची प्रशंसा यावेळी केली.

शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चिखली येथे साठ वर्षापूर्वी आदर्श विद्यालयाची स्थापना झाली. स्थापनेपासून या विद्यालयात गणपती उत्सव उत्साहात साजरा केला जातो. इथे नवव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. इथली विसर्जन मिरवणूक हे मोठे आकर्षण असते. या शाळेतील पाच हजार विद्यार्थी विविध समाजप्रबोधनात्मक देखावे सादर करतात. यावर्षी देखाव्यांमध्ये शेती पूरक व्यवसाय, नमो इंडिया, महाराष्ट्रातील साधुसंतांचे दर्शन, या चिमण्यांनो परत फिरा, मतदार राजा जागा हो, आजचे लोह पुरुष, खामगाव-जालना रेल्वे मार्ग होईल का, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन, पेड लगाओ पक्षी बचाव, अभिनंदन अभिनंदन, पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य सुख संपदा, डॉक्टर प्रकाश आमटे, सेव वॉटर सेव ट्री सेव अर्थ, श्री गजानन महाराज दिंडी, महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदतीचा हात, कावड यात्रा, मिशन चंद्रयान, एनडीआरएफ टीम, माणसातला देव, वाहतूक नियम पाळा अपघात टाळा, एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य, आमचे सैनिक आमचे प्राण, इको फ्रेंडली गणेशा, सदरक्षणाय खलनिग्रहणाय जुन्या काळातील गणेशोत्सव, एक देश एक मिशन एक सविधान, शिवजयंती प्लास्टिक मुक्त भारत, आम्ही निसर्गमित्र, नमामि गंगे, सौर ऊर्जा काळाची गरज, स्वागत भविष्याचे, अवयवदान जीवनदान, मोबाईलचे दुष्परिणाम, प्रगतीपथावर भारत हे देखावे सादर केले.

chikhli2

जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तडवी, चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ, शिप्रमंचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, उपाध्यक्ष नारायणराव राजपूत, सचिव प्रेमराज भाला, सहसचिव कैलास शेटे, भाऊसाहेब लाहोटी नाना बाहेकर, रामदास निमावत, राजाभाऊ खरात, विजयराव शेटे यांच्यासह शिप्रमंचे संचालक यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी विद्यालयाचे कौतुक केले. चिखली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील मिरवणुकीतील विद्यार्थ्यांसाठी जागोजागी पाणी, चॉकलेटचे वाटप केले. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी आदर्श प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक, गणपती उत्सव प्रमुख तसेच आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपती उत्सव प्रमुख यांच्यासह 100 शिक्षक शिक्षिकांनी अथक परिश्रम घेतले.

chikhli

आपली प्रतिक्रिया द्या