शिवसेनेच्या आंदोलनानंतर महसूल प्रशासनाला जाग

14

सामना प्रतिनिधी। चिखली

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला असतानाही पीक विम्याचे पैसे देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना न्याय मिळवून देण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. त्यानुसार बुलढाणा जिह्यात शिवसेनेने ठिकठिकाणी पीक विमा तक्रार निवारण केंद्र सुरू करत आंदोलनात्मक भूमिका घेताच महसूल प्रशासनानेही तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे.

पीक विम्यासाठी शेतकरी सरकारने ठरवून दिलेल्या एजन्सीच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम भरत असतो. यामध्ये दोन टक्के शेतकरी व 98 टक्के रक्कम सरकार भरत असतानाही शेतकरी संकटात असतानाही पीक विम्याची रक्कम शेतकऱयांना वेळच्या वेळी दिली जात नाही. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सुरू असलेल्या पीक विम्याच्या संदर्भातील अनागोंदी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना धारेवर धरत पीक विमा तक्रार निवारण केंद्र स्थापनेचे आदेश शिवसैनिकांना दिले होते.

पीक कर्ज, विमा योजनेच्या तक्रारीचे निराकारण
शिवसेनेचे बुलढाणा जिह्याचे संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी जिह्यात तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा तक्रार निवारण केंद्राची सुरुवात केली. या सर्व घडामोडींनंतर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी तालुक्याच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे आदेश काढले आहेत. चिखली तहसीलअंतर्गत ज्या शेतकऱयांच्या पीक कर्ज, पीक विमा, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत तक्रारी असतील त्या तक्रारी निवारण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समितीचे गठण करण्यात आले आहे .

आपली प्रतिक्रिया द्या