
रायगड जिल्ह्याला बालविवाहाचे ग्रहण लागले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या काळात बालविवाहाचे २१ गुन्हे दाखल झाले असून त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच सर्वात जास्त बालविवाह झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या वाढत्या बालविवाहाच्या प्रमाणाला रोखणार कोण, असा सवाल रायगडवासीयांनी केला आहे.
कायद्यानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करता येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यात १४ ते १७ वयोगटातील मुलींची लग्न लावून देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या रायगड जिल्ह्यातील आहेत. नेहमी त्या महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा याबाबत बोलत असतात. पण त्यांच्याच जिल्ह्यामध्ये बालविवाह सुरू असल्याचे दिसून येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर काही सामाजिक संस्थादेखील प्रयत्नशील असतात. पण सरकारने या संस्थांना बळ देण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बालविवाहामुळे येथील अल्पवयीन मुलींवर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम होताना दिसत आहेत. तर आई व बाळाच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत आहे.
13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद
रायगड जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणे हद्दीत बालविवाहाच्या २१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तळा पोलीस ठाणे हद्दीत ४ गुन्हे दाखल असून रोहा ३, कोलाड, वडखळ, पोयनाड येथे प्रत्येकी २ तर पाली, मांडवा, म्हसळा, रसायनी, मुरुड, अलिबाग, नागोठणे, महाड येथे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. तळा, म्हसळा तालुक्यात बाल विवाहाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
बालविवाहामुळे मुलीचे शिक्षण अर्धवट राहत असल्याचेही दिसून येत आहे. खेळण्या, बागडण्याच्या वयात लहान मुलींची लग्न लावून दिली जात असल्याने त्यांचे बालपणच हिरावून गेले आहे.