हिंदुस्थानात फोफावतेय चाईल्ड पॉर्नोग्राफी, पाच महिन्यात 25 हजार अश्लील साहित्य व्हायरल

596
प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेने हिंदुस्थानात चाईल्ड पॉर्नोग्राफी फोफावत असल्याचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानात चाईल्ड पॉर्नोग्राफी म्हणजेच लहान मुलांवरील अश्लील साहित्यात वाढ होत असल्याचा अहवाल अमेरिकेने हिंदुस्थानला दिला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा अहवाल अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन या संस्थेने दिला आहे. हिंदुस्थानात सध्या चाईल्ड पॉर्नोग्राफी वाढत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. गेल्या पाच महिन्यात हिंदुस्थानात विविध सोशल मीडियावर 25 हजार चाईल्ड पॉनोग्राफी साहित्य अपलोड झालं असून ते व्हायरलही होत आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान आणि अमेरिकेत अशा प्रकारे अहवाल देण्यासाठीचा करार करण्यात आला होता. त्या करारनुसार हा अहवाल अमेरिकेने दिला आहे.

यातील अश्लील साहित्य व्हायरल करण्याचं सर्वाधिक प्रमाण नवी दिल्ली इथलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक आहे. या राज्यांतून बाललैंगिक शोषण दाखवणारं साहित्य सोशल मीडियावर अपलोड केलं जातं. महाराष्ट्रात हा आकडा 1700 इतका असून सायबर युनिटला हा अहवाल देण्यात आला आहे. इतर राज्यांमध्येही हीच प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामागील गुन्हेगारांचा शोधही सुरू करण्यात आला आहे.

बाललैंगिक छळविरोधी कायदा अर्थात पोक्सोनुसार, चाईल्ड पॉर्नोग्राफीमध्ये फोटो, व्हिडीओ, खऱ्या खुऱ्या मुलाप्रमाणे दिसणारा डीजिटल किंवा कॉम्प्युटरनिर्मित फोटो किंवा लहान मुलांचे अडाप्टेड किंवा मॉडिफाय केलेले फोटो या सर्वांवर बंदी असून त्यासाठी शिक्षा होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या