मिरचीच्या दराने गाठला उच्चांक, यावर्षी तिखट पावडर महिलांच्या डोळ्यात पाणी आणणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पाऊस आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यात मिरची उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम बाजार भावांवर जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखट-मसाल्यांची तयारी सुरू झाली असली, तरी मिरचीच्या वाढलेल्या दरांनी गृहिणींचे गणितच बिघडवले आहे. मिरची पासून तयार केल्या जाणाऱ्या तिखट पावडरचा दर थेट एक हजार पन्नास रुपये किलोवर पोहचल्यामुळे महिलांच्या डोळ्यात आपोआप पाणी येवू लागलं आहे.

बाजारपेठेत तयार मसाल्यांचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी पारंपरिक पद्धतीने घरीच मसाले तयार करण्याला अजूनही प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लाल मिरची, धणे, जिरे, बडीशेप तसेच विविध खडे मसाले खरेदी करून ते वाळवून गिरणीत दळण्याची लगबग सध्या सुरू आहे. मात्र, यंदा मिरचीची आवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या विविध प्रकारांमध्येही मोठी दर तफावत दिसून येत आहे. घाऊक बाजारातील वाढीव दरांचा परिणाम किरकोळ विक्रीवरही झाला असून, किराणा बाजारात ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

मिरचीबरोबरच गरम मसाल्यासाठी लागणाऱ्या खड्या मसाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. लवंग 800 रुपये, काळीमिरी 750 रुपये, दालचिनी 300 ते 480 रुपये, तेजपत्ता 250 रुपये, मसाला वेलची 1800 ते 2300 रुपये, दगडफूल 1500 रुपये, नागकेशर 3000 रुपये, चक्रीफूल 400 रुपये, तर वेलची तब्बल 5000 रुपये किलो दराने विकली जात आहे.

हवामानातील अनिश्चित बदल, अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादन घटले असून बाजारातील आवक मर्यादित राहिली आहे. मागणी कायम वाढत असल्याने दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे. विशेषतः उन्हाळी मसाला तयारीच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे घरगुती अर्थकारणावर अतिरिक्त ताण जाणवत आहे.

सुक्या मिरचीच्या वाढत्या दरामुळे यावर्षी बाजारात विक्रीसाठी येणारे कर्नाटक येथील मिरची व्यापारी अद्याप आलेले नाहीत. तसेच स्थानिक बाजारपेठेत मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. मिरचीची तयार पावडर म्हणजे तिखट खरेदी करावे तर, त्याचा किलोचा दर एक हजार पन्नास रुपयांवर पोहचला आहे. गत वर्षी जुलै महिन्यात तिखटाचा दर 650 रुपये किलो होता. यावर्षी फेब्रुवारीत हा दर 850 रुपये झाला तर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात हाच दर 1050 रुपये किलोवर पोहचल्यामुळे तिखटाचा दर ऐकूनच महिलांच्या डोळ्यात पाणी येणार आहे.