कोरोना व्हायरसची दहशत, चीनमधील 13 शहरे बंद; 39 हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले

855
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढला असून आता तेथील 13 शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. तेथे राहणाऱया तब्बल 6 कोटी लोकांना तेथून बाहेर पडता येणार नाही की तेथे बाहेरच्या कुणाला जाऊ दिले जाणार नाही. मात्र या गडबडीत चीनमध्ये 39 हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहेत.

चीनमध्ये अडकलेल्या 39 विद्यार्थ्यांपैकी वुहान शहरात 25 हिंदुस्थानी विद्यार्थी आहेत. यातील 20 विद्यार्थी केरळमधील आहेत. याशिवाय हिंदुस्थानच्या 14 विद्यार्थ्यांना चीनमधील यिचांग शहरातून निघता येत नाही. हे सर्व विद्यार्थी चीनमधील रुग्णालयांमध्ये इंटर्नशीप करत होते. गुरुवारीच हे सर्व विद्यार्थी मायदेशी परतणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले आहेत.

हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयही चीनमधील कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे सतर्क झाले आहे. चीनमधील हिंदुस्थानी दूतावासानेही तेथील माहिती येथे पाठवली आहे. चीनमधून विमानाने येणाऱया प्रत्येक प्रवाशाची हिंदुस्थानात कसून तपासणी केली जात असून चीनमध्ये राहणाऱया हिंदुस्थानी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

यंदा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नाही
चीनमधील हिंदुस्थानी दूतावासामध्ये दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा होतो. मात्र कोरोना व्हायरसने येथे घातलेल्या थैमानामुळे यंदा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा होणार नसल्याचेही हिंदुस्थानी दूतावासाने शुक्रवारी स्पष्ट केले. चीनमध्ये आतापर्यंत या लसीची लागण 830जणांना झाली आहे. 20 प्रांतातील किमान 1072 लोक या व्हायरसमुळे प्रभावीत झाले आहेत. या रोगामुळे मरण पावलेल्यांची संख्या गुरुवारपर्यंत 26 झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या