
‘ऑपरेशन सिंदूर’ने तडाखा दिल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आले. शस्त्रसंधीनंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना आता चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा असल्याची घोषणा करणाऱ्या चीनने अरुणाचल प्रदेशातील तब्बल 27 ठिकाणांची नावे बदलून त्यांची यादीच जाहीर केली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थान आणि चीन संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 डोंगराळ, पाच रहिवासी परिसर, चार पर्वतरांगा, दोन नद्या आणि एका तलावाचे नाव बदलले असून त्यावर आपला दावा केला आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 27 ठिकाणांच्या नावांची यादी चिनी भाषेत नकाशासह प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक ठिकाणाला चिनी मँडरीन भाषेत नाव दिले असून रोमन अंकांत त्या ठिकाणांचा क्रमही नकाशात दाखवण्यात आला आहे.
चीनच्या या आडमुठेपणाला हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिले. कितीही नावे बदलली तरी वास्तव काही बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीनकडून हिंदुस्थानचे राज्य अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा हास्यास्पद प्रयत्न करण्यात येत आहे; परंतु आम्ही आमच्या भूमिकेशी एकनिष्ठ असून नाव बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही अनेकदा नावे बदलण्याचा प्रयत्न
चीनकडून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बीजिंगने अरुणाचल प्रदेशातील नावे बदललेल्या 30 ठिकाणांच्या नावांची यादी जाहीर केली होती. 2017 मध्ये चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने जांगनानमध्ये सहा ठिकाणांची नावे बदलली होती. त्यानंतर 2021 मध्ये 15 नावांची दुसरी यादी जाहीर केली होती. 2023 मध्ये 11 ठिकाणांच्या बदललेल्या नावांची यादी जाहीर केली होती.
तुमच्या घराचे नाव बदलले तर ते आमचे होईल का?
गेल्या महिन्यातही चीनने कुरापत काढली होती. त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले होते. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही राहणारच. नावे बदलून काहीही हशील होणार नाही. जर मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते आमचे होणार का, असा सवाल जयशंकर यांनी केला होता.