जिथे सुरुवात, तिथेच शेवट? चिनी शास्त्रज्ञांनी केला कोरोनावर औषध शोधल्याचा दावा

11690

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार उडवून दिला आहे. अमेरिका ते ब्रिटन आणि हिंदुस्थान ते रशिया या बलाढय देशांतही कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसवर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये शास्रज्ञ रात्रीचा दिवस करत आहेत. याच दरम्यान ज्या देशात कोरोनाचा उदय झाला त्याच चीन या देशातील शास्त्रज्ञांनी त्यावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. या औषधामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल आणि त्याचा खात्मा करण्यात येईल असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे.

चीनच्या प्रतिष्ठित ‘पेकिंग विद्यापीठ’मध्ये या औषधावर काम।सुरू आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. या औषधामुळे कोरोना संक्रमित झालेल्या व्यक्तीचा बरा होण्याचा कालावधी कमी होतो, यासह काही काळासाठी व्हायरस विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होते, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

उंदरांवर प्रयोग
विद्यापीठाच्या ‘बीजिंग एडवांस्ड इनोवेशन सेंटर फॉर जियोनॉमिक्स’चे निर्देशक सन्ने शी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. प्राण्यांवर या औषधांची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा, सन्ने शी यांनी केला. कोरोना संक्रमित उंदरांवर याचा प्रयोग करण्यात आला. संक्रमित उंदराला या औषधांचा डोज देण्यात आला तेव्हा त्याच्या शरीरातील विषाणूची संख्या पाच दिवसात कमी झाली. हा या औषधांचा प्रभाव असल्याचे, शी यांनी म्हटले.

हे औषध न्यूट्रिलाइजिंग अँटीबॉडीप्रमाणे काम करते. कोरोना विषाणूचा सामना करून पूर्णपणे बऱ्या झालेल्या 60 रुग्णांच्या रक्तापासून या औषधाची निर्मिती करण्यात आल्याचे, शी यांनी सांगितले. व्हायरस पासून संक्रमित होण्यापासून बचाव करण्यात हे औषध रामबाण असल्याचे ते म्हणाले. या वर्षाच्या अखेरपर्यंत याची मानवावर चाचणी घेऊन ते बाजारात आणले जाईल, अशी आशा शी यांनी व्यक्त केली. यामुळे 3 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना विषाणूपासून संरक्षण करता येईल, असेही ते म्हणाले. तसेच याची चाचणी ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशात करण्यात यावी कारण चीनमधील रुग्णसंख्या कमी होत आहे, असे ते म्हणाले.

याआधी एका आरोग्य अधिकाऱ्याने चीनकडे मानवावर चाचणी घेण्यासाठी पाच लसी उपलब्ध आहेत असे सांगितले होते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूवर लस तयार होण्यास 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या