चीनमध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 3 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चीनमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 63 वर्षे करण्यात आले आहे. तर महिला कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 55 वर्षांवरून 58 वर्षे करण्यात आले आहे. चीनमध्ये नवे निवृत्तीचे धोरण पुढील वर्षी 1 जानेवारी 2025पासून लागू करण्यात येणार आहे. याचबरोबर बांधकाम किंवा खाणकाम करणाऱ्या महिलांचे निवृत्तीचे वय 50 वर्षांवरून 55 वर्षे करण्यात येणार आहे. हे धोरण पुढील 15 वर्षांसाठी लागू राहणार आहे.
चीनमधील आयुर्मान (अधिक काळ जगणे) आता युनायटेड स्टेट्सपेक्षा जास्त आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार चीनमधील आयुर्मान 78 वर्षांपर्यंत पोहोचले आहे. निवृत्तीचे वय किमान 65 वर्षे असावे आणि ते पुरुष व स्त्रियांसाठी समान असले पाहिजे, असे चायना पेन्शन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जगात हिंदुस्थाननंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीनसमोर आता नवीन संकट उभे राहत आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये चीनमध्ये लोकसंख्या वाढ कमी झाली आहे. 2022 मध्येही तेथील लोकसंख्या वाढीला ब्रेक लागला होता.
30 कोटी लोकांना पेन्शन
चीनमध्ये पेन्शन घेणारी लोकसंख्या 30 कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे सरकारला जास्त पेन्शन द्यावी लागत आहे. हा पैसा जनतेला पगाराच्या स्वरूपात द्यावा, त्या बदल्यात त्यांच्याकडून काम करून घेता येईल, असा सरकारचा विचार आहे. चीनमधील बहुतांश लोक सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे चीनच्या पेन्शन फंडावर दबाव वाढला आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातील चीनची लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे संशोधक शिउजियान पेंग यांनी सांगितले.