
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०० टक्के कर लादण्याच्या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. चीनच्या अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी माध्यमांना सांगितले की, जर अमेरिकेला लढायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढू, जर त्यांना वाटाघाटी करायच्या असतील तर त्यांनी धमक्या देणे थांबवावे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने अनेक दुर्मिळ खनिजांबाबत नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार, चीनमधून दुर्मिळ खनिजे खरेदी करून परदेशात विकू इच्छिणाऱ्या कोणत्याही कंपनीला आधी चीन सरकारकडून परवाना घ्यावा लागेल. ट्रम्प यांनी हा निर्णय शत्रुत्वपूर्ण असल्याचे म्हंटले आणि जर चीनने माघार घेतली नाही तर, अमेरिका नवीन तिहेरी अंकी (१००% पेक्षा जास्त) कर लादेल, असा इशारा दिला आहे.
यावरच आता चीन सरकारने म्हटले आहे की, चिनी जहाजांवर शुल्क लादण्याची योजना आखून अमेरिकेने चर्चेचे वातावरण बिघडवले. मे महिन्यात ट्रम्प यांनी चिनी कंपनी हुआवेईवर निर्बंध लादले होते, चिप्स आणि सॉफ्टवेअर ब्लॉक केले होते आणि चिनी विद्यार्थ्यांसाठी व्हिसाची धमकी दिली होती, तशीच ही परिस्थिती आहे. दरम्यान, चीनने असेही म्हटले आहे की, संपूर्ण बंदी घातली गेली नाही, परंतु दुर्मिळ खनिजांना आता परवाने आवश्यक आहेत.