कोरोनाचा कहर, चीनमध्ये एकाच दिवशी 242 नागरिकांचा मृत्यू

519

चीनमध्ये हाहाकार माजवणाऱया कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी चीनमध्ये एका दिवशी 242 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मृतांचा एकूण आकडा 1310 झाला आहे.

चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाच उद्रेक आहे. काल नव्याने 14 हजार 840 रुग्ण आढळले. सरकारने गुरुवारची आकडेवारी अद्याप जारी केलेली नाही. मात्र कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 44,763 च्या पलीकडे गेली आहे. दरम्यान, हुबेई प्रांतात आरोग्य व्यवस्थेबाबत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हुबेईचे प्रांत प्रमुख जियांग चाओलिंआंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांची जबाबदारी शांघाईच्या महापौरांना देण्यात आली आहे.

 जपानच्या किनाऱयावर असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील दोन हिंदुस्थानींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.

 हाँगकाँगमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 49 पैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

 रशियात दोघींना कोरोनाची लागण झाली आहे. या महिलांनी रुग्णालयाच्या स्वतंत्र कक्षातून पलायन केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

कोलकात्यात तिघांना लागण
कोरोना व्हायरस जगभरात पसरू लागला आहे. बँकाँक येथून विमानाने कोलकात्यात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक कौशिक भट्टाचार्य यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यापैकी दोन जणांना बेलिघाट आयडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. थर्मल स्कॅनिंगमध्ये आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, कोलकाता आणि चीनदरम्यानची थेट विमानसेवा बंद करण्यात आली आहे. इंडिगोने तर 6 फेब्रुवारीपासून कोलकाता आणि गुंगझोव्हदरम्यानची विमानसेवा रद्द केलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या