
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला होणारी भाविकांची अलोट गर्दी यंदा पाहायला मिळणार नाही. देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मंडळाने चिंतामणीच्या मंडपातच मुर्ती घडविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार मुर्ती बनविण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे. मुर्ती जागेवर घडविण्याची चिंतामणीच्या मूर्तिकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शविली असल्याची माहितीही मंडळाने दिली आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मंडळाचे हे 101 वे वर्ष आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा रद्द करून ठरावीक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत शारीरिक अंतर पाळून साधेपणाने पाटपूजन होईल. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय रुग्णालयाला वैद्यकिय उपकरणे, तसेच गरजूंकरिता रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले.






























































