लेगिंग्जमध्ये लपवून आणले पाच कोटींचे चिनी फटाके; जेएनपीएमध्ये कारवाई

चीनमधून चोरट्या मार्गाने हिंदुस्थानमध्ये पाठवण्यात आलेले ४ कोटी ८२ लाख रुपये किमतीचे फटाके महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहेत. ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत ४६ हजार ६४० फटाके जप्त करण्यात आले असून हे फटाके लेगिंग्जमध्ये लपवण्यात आले होते. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

जेएनपीटीए बंदरात चीनमधून आलेल्या एका ४० फूट लांबीच्या कंटेनरमध्ये ४ कोटी ८२ लाख रुपये किमतीचे ४६ हजार ६४० फटाके चोरट्या मार्गाने पाठवण्यात आली असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कंटेनरची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका कंटेनरमधील लेगिंग्जमध्ये फटाके लपवल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून या कंटेनरमध्ये लेगिंग्ज ठेवण्यात आल्या होत्या. मागील बाजूला असलेल्या लेगिंग्जमध्ये हे फटाके लपवण्यात आले होते. याप्रकरणी गुजरातमधील वेरावळ येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बंदराच्या सुरक्षेला धोका
धोकादायक वस्तूंच्या बेकायदेशीर आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा, बंदराच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना आणि व्यापक नौकावहन आणि लॉजिस्टिक्स साखळीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ अंतर्गत जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.