लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले, हिंदुस्थानी लष्कराची माणुसकी; गरम कपडे, जेवण दिले

chinese-soldiers-in-ladakh

लडाखच्या दुर्गम भागात हिंदुस्थानी लष्कराने कॉर्पेरल वांग या चिनी सैनिकाला पकडले. लष्कराने माणुसकी दाखवून या चिनी सैनिकाला गरम कपडे, जेवण दिले. चौकशी करून या सैनिकाला चिनी लष्कराच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. दरम्यान, चिनी लष्करानेही आपला एक सैनिक चुकीने हिंदुस्थानी भूभागात आल्याचे हिंदुस्थानी लष्कराला कळवले आहे.

लडाखचा चुमार-डेमचोक हा भाग अतिशय दुर्गम आहे. या भागातील डोंगररांगामध्ये एक चिनी सैनिक भटकत होता. हिंदुस्थानी लष्कराने या सैनिकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चिनी लष्कराचे काही दस्तऐवज होते. तो अतिशय भेदरलेला होता. पाऊस व थंडीमुळे त्याचे बेहाल झाले होते. भुकेने व्याकूळ झालेल्या या चिनी सैनिकास जेवण, गरम कपडे दिले. त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. सावरल्यानंतर या चिनी सैनिकाची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडचे दस्तऐवज तपासण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल येथील माल्डो येथे त्याला चिनी लष्कराच्या स्वाधीन करण्यात येईल, असे हिंदुस्थानी लष्कराने निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या