चिपी विमानतळ सज्ज! हरितालिकेला ‘लॅँडिंग’ची चाचणी!!

सामना ऑनलाईन, मुंबई

यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावर विमानाचे लॅण्ंिडग होण्याचे तमाम सिंधुदुर्ग व कोकणवासीयांचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. 12 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळावर पहिल्या विमानाचे लॅण्डिंग  होईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) व जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. या विमानतळावर विमान उतरवण्याची चाचणी होणार असल्याने बारा आसनी या विमानात कोणीही व्हीव्हीआयपी प्रवासी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र 12 नोव्हेंबर रोजी पहिले प्रवासी विमान, तर 12 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विमान सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल. या विमानतळामुळे पर्यटनाला प्रचंड चालना मिळणार असून सिंधुदुर्ग जिह्याचा चेहरामोहरा बदलून जाईल, असे केसरकर म्हणाले.

येत्या 12 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन मुंबईतून बारा आसनी जेट विमान सिंधुदुर्गच्या दिशेने हवेत झेपावेल. शाडूची मूर्ती घेऊन पहिल्या विमानाचे सिंधुदुर्ग विमानतळावर लँडिंग होईल. दीड दिवसासाठी विमानतळावर या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विमानातून येणाऱया गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आपण स्वतः तसेच खासदार विनायक राऊत विमानतळावर उपस्थित राहणार आहोत असे ते म्हणाले.

पहिल्या विमानातून व्हीव्हीआयपींना सिंधुदुर्गात नेण्याची योजना होती; पण विमान उतरवण्याची चाचणी (टेस्ट लँडिंग) असल्याने नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने या विमानातून व्हीव्हीआयपींना नेण्याची परवानगी नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विमानतळावर विमान उड्डाण व उतरवण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षा यंत्रणेची स्थापना होत आहे. ही यंत्रणा संपूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर 12 नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होईल. तर 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय विमाने सिंधुदुर्ग विमानतळावर उतरतील. आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने सिंधुदुर्गासाठी आठवडय़ातून तीन दिवस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचे मान्य केले आहे. माल्टा या देशाचे पंतप्रधान 12 डिसेंबर रोजी विमानाने सिंधुदुर्ग विमानतळावर येतील.

पर्यटन व उद्योगाची भरभराट

सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्यावर पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. सध्या दुबईला माल्टामधून मासे निर्यात होतात. पण सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्यावर सिंधुदुर्गातून थेट दुबईला मासे निर्यात होतील. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गात पर्यटकांची रेलचेल वाढणार

गोव्यात दरवर्षी 30 ते 35 लाख पर्यटक येतात, तर सिंधुदुर्गात सुमारे 14 लाख पर्यंटक येतात. आंबोलीतल्या धबधब्यावर मोसमात दीड लाख पर्यटक येतात. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्यावर पर्यटकांची वर्दळ वाढेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पर्यटकांना देण्यात येतील.

काजूच्या बोंडापासून वाइन

काजूची बोंडे वाया जातात. या काजूच्या बोंडांपासून वाइन व नॉन अल्कोहोलिक पेय करण्याची योजना आहे. काजूच्या बोंडापासून वाइनची निर्मिती करण्यासाठी काजूची बोंडे चाचणीसाठी फ्रान्सला पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हॅप्पी एग्ज

मोकळय़ा वातावरणात वाढणाऱया कोंबडय़ांची अंडी अधिक पौष्टिक असतात असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील लोकांना 100 कोंबडय़ांची पिल्ले विनामूल्य देण्यात येतील. या हॅप्पी एग्जला देश-विदेशात मोठी मागणी आहे. त्याशिवाय चांदा ते बांदा भागातील लोकांना गीर व सेहवाग या जातीच्या दोन गाई दुधासाठी दिल्या जातील. त्याशिवाय 100 शेळय़ा व एक म्हैस दिली जाईल. खाडीत मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी 500 पिंजरे देण्यात येतील. कोंबडय़ांची पिल्ले, गाई व शेळय़ा तीन महिन्यांत दिल्या जातील.

वुडन कॉटेज

सिंधुदुर्गाला नितांतसुंदर समुद्रकिनारा व खाडय़ांचा परिसर लाभला आहे. या किनाऱयांवर वुडन कॉटेज उभारण्यात येतील. एका आंतरराष्ट्रीय कंपनीने दोन दिवसांत वुडन कॉटेज उभारण्याची तयारी दाखवली आहे. माल्टाचे पंतप्रधान अशा वुडन कॉटेजमध्ये सिंधुदुर्गाचा पाहुणचार घेतील. सिंधुदुर्गात न्याहारी निवास योजनेचा विस्तार करण्यासाठी बँक व खासगी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.